

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : वयाच्या 81 व्या वर्षी पंतप्रधान होणार्या मोरारजी देसाई यांचा कित्ता मी गिरवू इच्छित नाही. आता सक्तीची कुठलीही जबाबदारी घेणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण पंतप्रधानपदाचा उमेदवार नसल्याचे सोमवारी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून आपल्या महाराष्ट्र दौर्याला पवारांनी सुरुवात केली. पक्ष पदाधिकार्यांच्या बैठका घेत आगामी महापालिका निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्रपणे लढायच्या की स्वबळावर, यावर कार्यकर्त्यांची मते जाणून त्यांनी जाणून घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, लोकशाही वाचविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्यासाठी गरज आहे. भाजपला देशपातळीवर पर्याय उभे करण्यासाठी समविचारी लोकांना एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे पवार म्हणाले. पवारांचे बोट पकडून राजकारणात आल्याचे पंतप्रधान मोदी हे नेहमी सांगत असतात; पण आता माझे बोट इतके महाग पडेल असे देशाला वाटले नव्हते, अशी मिश्कील टिपणी त्यांनी केली. ठाण्याने सुसंस्कृत नेतृत्व द्यावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडावर टीकास्त्र सोडत ठाणेकरांनी सुसंस्कृत नेतृत्व द्यावे, असे आवाहन पवार यांनी केले. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर जनतेतून सत्ता मिळत नसल्याने ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यासारख्या यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांवर कारवाई केली जात असल्याचे पवारांनी नमूद केले. यावेळी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, आनंद परांजपे आदी नेते उपस्थित होते.
नातू रोहित पवार यांच्याबाबत भाजप नेत्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत पवार म्हणाले, रोहित पवारांचे काय होणार याची भविष्यवाणी भाजप नेत्यांनी आधीच केली आहे. कोणतीही चौकशी झालेली नसताना भाजप नेते अशी वक्तव्ये करत आहेत.