मुंबई पोलिसांचे ‘ऑपरेश झारखंड

ऑनलाईन फसवणूक
ऑनलाईन फसवणूक

ठाणे; पुढारी डेस्क : नागरिकांना ऑनलाईन लुटणाऱ्या भामट्यांचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. या कारवाईसाठी मुंबईच्या गावदेवी पोलिसांनी ऑपरेश झारखंड ही विशेष मोहीम राबवली. तब्बल २० दिवस नक्षली भागांमध्ये तळ ठोकून ५ भामट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हे आरोपी हाती लागल्याने गावदेवी पोलीस ठाण्याचे २ तर वर्सोवामधील एका गुन्ह्याची उकल झाल्याची माहिती रविवारी मुंबईत दाखल झालेल्या पोलिसांनी दिली.

ग्रॅन्ट रोड परिसरातील नाना चौक येथे ५० वर्षीय सर्जेराव (बदललेले नाव) कुटुंबियासह राहतात. त्यांना हॉटेलमधून जेवणाचा मागवयाचा होता. त्यासाठी त्यांनी इंटरनेटवर घरपोच डबा पोहोचवणाऱ्यांची माहिती सर्च केली. इंटरनेटवर प्राप्त झालेल्या एका मोबाईल नंबरवर सर्जेराव यांनी संपर्क साधला.

ऑनलाईन लुटीच्या जाळ्यात सर्जेराव अडकल्याचे लक्षात येताच भामट्याने त्यांना वेबसाईटवर रेजिस्टेशन करण्यास सांगितले. त्वरित जेवण मिळण्याकरिता भामट्याने एसएमएसवर पाठवलेल्या लिंकवर क्लिक करून त्यांनी आपली वैयक्तिक माहिती भरली. त्या लिंकमुळे सर्जेराव यांच्या मोबाईलचा ॲक्सेस भामट्याच्या हाती लागला आणि काही क्षणात त्यांच्या खात्यातून ८९ हजार ट्रान्सफर झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सर्जेराव यांनी तत्काळ गावदेवी पोलीस ठाणे गाठले.

या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास तांत्रिक माहितीच्या आधारे सुरू असताना हवालदार मुन्ना सिंह यांना फसवणूक करणारे झारखंडमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. त्या माहितीच्या आधारे उपायुक्त अभिनव देशमुख, सायबर गुन्हे प्रकटीकरणचे एसीपी रवी सरदेसाई, व पोनि शशिकांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास शिंदे, पोउपनि पंकज होले, अंमलदार चंद्रकांत वाकळे, पुंजाराम गाडेकर, मधुकर निकोळे हे झारखंडला रवाना झाले. तेथे सापळा लावून नागेश्वर ठाकूर (२९), संतोषकुमार मंडल (२९) यांच्या मुसक्या आवळल्या.

दरम्यान, या आरोपींचे आणखी साथीदार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार झारखंडमधील डुमका, देवगर या जिल्ह्यांमध्ये सापळा लावून आरोपी रितेशकुमार मंडल, छोटेलाल सालिग्राम मंडल, राजकुमार मंडल यांच्या मुसक्या आवळल्या. या आरोपींनी ग्रॅन्टरोड व वर्सोवा परिसरात विद्युत बिल भरण्यासाठी बोगस लिंक पाठवून लाखो रुपये ऑनलाईन लुटले होते. या आरोपींपैकी संतोषकुमार, रितेशकुमार मंडल हे दोघे सराईत आरोपी असून त्यांच्यावर झारखंडमध्ये फसवणुकीचे २ गुन्हे दाखल आहेत. हे आरोपी हाती लागल्याने मुंबईतील गावदेवी, वर्सोवा येथे ऑनलाईन ४ लाख ७९ हजार लुटलेल्या ३ गुन्ह्यांची उकल झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news