

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ७ जिल्ह्यांतील २२ जागा बिनविरोध झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नियामक मंडळाच्या ६० पैकी २२ जागा बिनविरोध झाल्याची चर्चा असली तरी उर्वरित जागांसाठी अनेक दिग्गज रिंगणात असल्याने परिषदेच्या कामकाजात कुणाकुणाचा नव्याने उदय होतो की जुनेच शिलेदार परिषदेवर येणार हे नजीकच्या काळात स्पष्ट होणार आहे. १४ मार्च रोजी पात्र उमेदवारांची यादी जाहीर होणार असून १६ एप्रिल रोजी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळासाठी मतदान होणार असून प्रक्रिया पूर्ण होऊन मे महिन्यात नाट्य परिषदेला नवी कार्यकारिणी मिळणार आहे.
गेल्या २ – ३ वर्षांपासून नाट्य परिषदेतील वाद विकोपास गेले होते. तहहयात विश्वस्त या नात्याने शरद पवार यांच्यासारख्या दिग्गजांनी मध्यस्थी करूनही हे वाद थांबायचे नाव घेत नव्हते. त्यातच मार्च महिन्यात मुदत संपल्याने नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या २०२३ ते २८ या कालावधीसाठीच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू झाली. नुकत्याच अद्ययावत झालेल्या मतदार यादीनुसार सुमारे २८ हजार मतदारांच्या हाती ६० उमेदवारांचे भवितव्य आहे. ६० जागांसाठी सुमारे १५० च्या घरात अर्ज दाखल झाले होते.