बंडखोर एकनाथ शिंदें विरोधात पालघरात मोर्चा

बंडखोर एकनाथ शिंदें विरोधात पालघरात मोर्चा

पालघर : पुढारी वृत्तसेवा पालघर जिल्ह्यात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील झालेले आमदार श्रीनिवास वनगा यांच्या विरोधात रस्त्यावर उतरणारे शिवसेनेचे तत्कालीन पदाधिकारी दिसून आले. त्यामुळे सर्व कार्यकर्ते थांबा आणि वाट पहा या निष्कर्षापर्यंतच आहेत.

पालघर जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गेल्या पाच ते सहा वर्षांत निवडणुका लढविल्या गेल्या आणि यशापयशाचे साक्षीदारही हे कार्यकर्ते असल्याने कुणी कुणाबरोबर जावे आणि कुणी नाही हे ठरविताना त्यांनी कोणताही पवित्रा घेतला नसल्याचे दिसून येते. मात्र, रविवारी सकाळी हुतात्मा चौकात शिवसेनेच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात रॅली काढून उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शविला आणि वनगा यांच्याबाबतही नाराजी व्यक्त केली.

यावेळी महिला यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण, पालघर उपनगराध्यक्ष उत्तम घरत, आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे, माजी जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, ज्येष्ठ शिवसैनिक केतन पाटील, विनोद पाटील, प्रभाकर राऊळ, तालुकाप्रमुख विकास मोरे,गटनेते कैलास म्हात्रे, जगदीश धोडी, वैभव संखे, भूषण संखे, कुंदन संखे, अजय ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यात गेली अनेक वर्षे काम करणारे निष्ठावंत सध्या एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वामुळे बाजूला फेकले गेले आहेत. यामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या सर्वांना अनेक निवडणुकांमध्ये सहभागी करून घेतले नव्हते. यामध्ये शिंदे समर्थकांचाच पगडा होता.
अनेक ठिकाणच्या पदाधिकार्‍यांमध्ये बदल घडवून त्यांना बळ देण्याचे काम शिंदे करीत असल्याने काही जुन्या कार्यकर्ते दुखावले आहेत. त्यामुळे शिंदे गटाकडे पालघर जिल्ह्यात कार्यकर्त्यांची किती प्रमाणावर फौज आहे, हे सध्या तरी सांगणे कठीण आहे. ज्या प्रकारे ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे समर्थनार्थ गेले तीन दिवस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले त्याप्रमाणे पालघर जिल्ह्यात ती स्थिती अद्यापही निर्माण झालेली नाही. जे रस्त्यावर उतरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन देत आहेत, त्यामध्ये अनेक जुन्या पदाधिकार्‍यांचा समावेश होता.

… तर मनसेला येतील सुगीचे दिवस

एकनाथ शिंदे गटाने सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी एकनाथ शिंदे गटाला कोणत्या तरी पक्षाला समर्थन द्यावे लागणार असून ते मनसेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. मात्र, पालघर जिल्ह्यात मनसे फॅक्टर चालू शकला नसल्याने तिथे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच कार्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आले आहेत. मनसेची ताकद जरी मोठी नसली तरी त्यांचे कार्यकर्ते नेहमीच चर्चेत असल्याचे दिसून येतात. यापूर्वी मनसेमध्ये असलेले जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. संखे यांची मनसेचा कार्यकर्ता म्हणून जी आंदोलने पाहता सद्यस्थितीत तरी मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये शिथीलता दिसून येते. जर का शिंदे यांनी आपला गट मनसेमध्ये विलीन करून भाजप प्रणित सरकारला पाठिंबा दिला तर मनसेला पालघर जिल्ह्यात सुगीचे दिवस येण्यास वेळ लागणार नाही.

  • सध्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मेळावे घेण्यात येत असून त्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ज्योती ठाकरे यांचा समावेश दिसून येत आहे.
  • सध्या बोईसर, सफाळे, जव्हार आदी ठिकाणी काही पक्ष कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत, त्यांना एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी शिवसेनेच्या निर्णय प्रक्रियेमध्ये बाजूला ठेवले होते. त्यामुळे आम्हा निष्ठावंत कार्यकर्त्यांना शिंदे बाजूला सारून व्यावसायिक लोकांना त्यांनी शिवसेनेची महत्त्वाची पदे दिल्याचा आरोप होत होता. परंतु, शिवसेना पक्षप्रमुखांनी पालघरची जबाबदारी शिंदे यांच्याकडे दिल्याने ते त्यामध्ये हस्तक्षेप करीत नसत.
  • शिंदे यांनी सर्व जबाबदारी पार पाडावी असा आदेश असल्याने त्यांनी विश्वास ठेवला होता. पालघरमध्ये असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये एकनाथ शिंदे यांनी 90 टक्के कार्यकर्त्यांना आपल्या विश्वासात घेतले आहे. त्यामुळे जे रस्त्यावर उतरले नाहीत ते एकनाथ शिंदे यांचेच समर्थक असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

शिंदे यांचे बंड हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. जो नेता उद्धव साहेबांच्या जवळ होता त्यांनी अशा प्रकारची टोकाची भूमिका घेणे हे दुःखदायी आहे. जिल्हाप्रमुख उपस्थित नसल्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की जिल्हाप्रमुख आज उपस्थित आहेत नाहीत याने काही फरक पडत नाही. शिवसेना ही संघर्ष मधून उभी राहिलेली आहे. ही संघटना मोठी होण्यास शिवसैनिकांचा हात आहे. शिवसेना ही संघटना संकट काळात धीराने उभी राहते व ती जोमाने मोठी सुद्धा होते.
-केदार दिघे, आनंद दिघे यांचे पुतणे

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news