डोंबिवली : कोरोनाकाळात घरफोडी करणारी टोळी जेरबंद

डोंबिवली : कोरोनाकाळात घरफोडी करणारी टोळी जेरबंद

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा :  कोरोना काळात बंद घरांसह दुकाने फोडून धुमाकूळ घालणार्‍या सराईत घरफोड्या टोळीला गजाआड करण्यात कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे या टोळीतील दोन बदमाश एका दुकानात चोरी करताना सीसीटीव्हीत कैद झाले होते. हा धागा पकडून या टोळीतील 5 जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून आरोपीमध्ये एका अल्पवयीन चोरट्याचा समावेश आहे.

कोरोनाच्या काळात घरफोड्याच्या घटनात कमालाची वाढ झाली होती. त्यानंतर 2021 ते आतापर्यत घरफोड्या करणार्‍या सराईत चोरट्यांच्या टोळीने महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 घरफोड्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यातच 1 फ्रेबुवारी 2022 रोजी कल्याण पश्चिमेस असलेल्या चिकनघर भागातील सोनी चिरमा स्विटस अ‍ॅण्ड ट्रस्ट या दुकानाचे शटर रात्रीच्या सुमारास तोडून चोरट्याने दुकानातील 32 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल परफोडी लंपास केला. या चोरी प्रकरणी दुकानमालक गणेश सीताराम मापारी
यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपासकामी पोलिसांची 2 पथके स्थापन करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला.

या गुन्हयात आरोपी मोहमद करीम उर्फ लाडो अख्तरअली बागवान याला अंबरनाथमधून उचलले. अटक केलेल्या मोहमद ऊ र्फ लाडो
याचा सखोल तपास करून चोरीस गेलेली 7 हजारांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली, तर त्याचा साथीदार साकीर जाकर खान हा चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून 5 हजार रुपये रोख रक्कमसह गुन्ह्यात वापरलेली स्कूटी जप्त केली.

अटक आरोपी सफर जाकीर खान याच्याकडे केलेल्या तपासात त्याने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवम महेंद्र ऊ र्फ मच्छी याच्या सोबत मिळून 7 घरफोड्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या दोघांनाही अंबरनाथमधून, तर एकाला कल्याण तालुक्यातील म्हारळ गावातून अटक केली. अटक टोळीकडून आतापर्यंत 7 गुन्ह्यातील 15 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. या दागिन्यांमध्ये मंगळसूत्र, सोनसाखळी, कानातील कुड्या, कर्णफुले, तसेच सुमारे अर्धा किलो वजनाची चांदीची भांडी असा 8 लाखांचा मुद्देमाल जप्‍त केला.

आरोपींविरुद्ध 9 गुन्हे दाखल

अटक टोळीतील चोरटे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, विक्राळी अशा विविध पोलीस ठाण्यांतून एकूण 9 गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news