ठाण्यात चार हजारावर मुले शाळाबाह्य; आरोग्य विभागाची माहिती

ठाण्यात चार हजारावर मुले शाळाबाह्य; आरोग्य विभागाची माहिती

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  ग्रामीण, शहरी व मनपा विभागातील शून्य ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार उपचार तथा शस्त्रक्रिया करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जागरुक पालक, सुदृढ बालक अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा स्तरावर केलेल्या सूक्ष्म कृती आराखड्यात ग्रामीण भागात ६ ते १८ या वयोगटात ४ हजार २६९ बालके ही शाळाबाह्य असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने जून महिन्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार एकही विद्यार्थी शाळाबाह्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे आरोग्य विभागाने केलेले सर्वेक्षण नेमके कधीचे आहे व कोणते सर्वेक्षण खरे आहे असा प्रश्न उभा राहिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील ० ते १८ या वयोगटातील बालकांच्या आरोग्य तपासणीला सुरू झाली आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, आश्रम शाळा अंध-दिव्यांग शाळा, अंगणवाड्या, बालगृह , बालसुधार गृहे, अनाथालये, समाजकल्याण व आदिवासी विभाग वसतिगृहे, खाजगी नर्सरी, बालवाड्या, खासगी शाळा व खासगी कनिष्ठ महाविद्यालये तसेच शाळाबाह्य अशा शून्य ते १८ वर्षापर्यंतच्या मुला-मुलींची आरोग्य तपासणी होणार आहे. या तपासणी दरम्यान आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार व संदर्भ सेवा पुरविण्यात येणार आहे.

जागरुक पालक, सुदृढ बालक अभियानातंर्गत ठाणे जिल्ह्यातील पाचतालुक्यातील ० ते १८ या वयोगटातील जवळपास ४ लाख ९३ हजार ८३४ बालकांची तपासणी केली जाणार आहे. त्यामध्ये १ लाख ५५ हजार ७०० बालक हे ० ते सहा वयोगटातील असून उर्वरित ३ लाख ३८ हजार १३४ बालक हे सहा ते १८ वयोगटातील आहेत. यामध्ये ४ हजार २६९ बालके शाळाबाह्य आहेत. तर अंबरनाथ तालुक्यात सर्वाधिक १ हजार ५६८ शाळाबाह्य बालके असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news