ठाणे : शहापुरात कुपोषणाचा विळखा घट्ट

ठाणे : शहापुरात कुपोषणाचा विळखा घट्ट
Published on
Updated on

डोळखांब; दिनेश कांबळे :  शहापूर तालुक्यातील कुपोषित बालकांच्या कच्च्या आहारातून तेलच गायब झाले आहे. विविध समस्यांनी ग्रासलेल्या शहापूर तालुक्याला कुपोषणाचा विळखा घट्ट बसत चालला आहे. तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये गेल्या महिन्यात तब्बल 795 कुपोषित बालके आढळून आली. त्यापैकी तीव्र कुपोषित असलेली 85 बालके मृत्यूशी झुंज देत आहेत. तर गेल्या महिन्याभरात
7 बालकांचा मृत्यू झाला असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

शहापूर तालुक्यात मिनी अंगणवाड्यांसह 729 अंगणवाड्या असून त्यामध्ये 30 हजार 417 बालके आहेत. यात दर महिन्याला 0 ते 6 वयोगटातील मुलांचे अंगणवाडी सेविकांमार्फत वजन घेतले जाते. वजन कमी असल्यास या बालकांची मध्यम कुपोषित आणि तीव्र कुपोषित अशी वर्गवारी केली जाते. मात्र, तालुक्यात कुपोषित बालकांसाठी तसेच गरोदर व स्तनदा मातांसाठी राबविण्यात येणार्‍या
विविध आहार योजनांचा बोजवारा उडाला आहे. शेती हंगामा व्यतिरिक्त रोजगारासाठी भटकंती करावी लागत असल्याने कुपोषण फोफावत चालले आहे. विद्यमान सरकार मात्र याकडे डोळेझाक करीत असल्याने कुपोषणाची तीव्रता वाढत चालली आहे.
तालुक्यातील शहापूर व डोळखांब प्रकल्पांतर्गत 710 मध्यम कुपोषित तर 85 बालके तीव्र कुपोषित असून गेल्या महिन्यात विविध आजाराने ग्रासलेल्या सात बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद शासनदरबारी आहे. कुपोषित बालकांचे उंचीनुसार वजन प्रमाणात
येण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. मात्र या योजनांमधून मूळ उद्देशच सफल होत नसल्याने कुपोषित बालकांच्या आकडेवारीत वाढ होत आहे.

तेलाअभावी आहार शिजवायचा कसा?

कुपोषित बालकांसाठी तसेच गरोदर व स्तनदा मातांसाठी राबविण्यात येणार्‍या घरपोच आहार योजनेत कच्चा आहार देण्यात येतो. त्यामध्ये 50 दिवस पुरेल इतके गहू, मूगडाळ, चणाडाळ, साखर, हळद, मीठ मिरची देण्यात येते. हा कच्चा आहार शिजविण्यासाठी आवश्यक असणारे तेल देण्यात येत नसल्याने तेलाअभावी आहार शिजवायचा कसा हा जटील प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गरोदर
आणि स्तनदा मातांसाठी असलेल्या अमृत आहार योजनेचाही बोजवारा उडाला आहे.

35 रुपये ताट देणे अशक्यच

या योजनेत धान्य विकत घेऊन व शिजवून या मातांना अवघ्या 35 रुपयांत देण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर सोपवण्यात आली असल्याने त्यांची अक्षरशः पिळवणूक होत असल्याचे समजते. महागाई गगनाला भिडली असताना 35 रुपये ताट देणे अशक्यच असल्याने त्यांना परिपूर्ण आहार मिळत नसल्याची ओरड होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news