डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : युट्यूबवर बँक दरोड्याच्या वेब सिरीज पाहून फिल्मी स्टाईलने 12 कोटींची रोकड पळविणार्या बँकेच्या कॅश कस्टोडियन मॅनेजरला मानपाडा पोलिसांना अडीच महिन्याच्या तपासांनंतर पुण्यात बेड्या ठोकल्या. अल्ताफ शेख (43) असे अटक आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात तत्पूर्वी मॅनेजरच्या 3 साथीदारांसह त्याच्या बहिणीला अटक करण्यात आली आहे.
डोंबिवलीतील एमआयडीसीत आयसीआयसीआय बँकेची शाखा आहे. या बँकेत मुख्य आरोपी अल्ताफ हा कॅश कस्टोडियन मॅनेजर म्हणून नोकरी करत होता. झटपट श्रीमंत होण्यासाठी बँकेतील तिजोरीवर डल्ला मारण्याचा कट रचला होता. अनेक बेव सिरीज पाहून त्याला बँकेच्या तिजोरीतून रोकड कशी उडवायची याची कल्पना सूचली. त्यातच तो कॅश कस्टोडियन मॅनेजर असल्याने त्याला बँकेविषयी सर्वच माहिती होती. त्यामुळे तो रोकड लुटण्यासाठी संधीची वाट पाहत होता. बँकेतील तिजोरी रूमच्या बाजूला असलेल्या एसी दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने त्याला आयती संधी मिळाली. एसीच्या डक्टमधून बँकेच्या तिजोरीत जाण्यासाठी त्याने नियोजनबद्ध प्लॅन केला. 9 जुलै रोजी सुटीच्या दिवशी त्याने डल्ला मारण्यासाठी निवडला. प्रथम त्याने अलार्म निष्क्रिय केला. सर्व कॅमेर्यांच्या हार्डडिस्क काढून टाकल्या आणि तिजोरीतून 34 कोटी रुपये त्याने एसीच्या डक्टमधून बनवलेल्या छोट्या छिद्रातून ही रोकड बँकेच्या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या कचरापेटीनजीक ताडपत्रीने झाकून ठेवली.
बँकेत चोरी झाल्या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीने कुठलाही सुगावा मागे न ठेवल्याने एक महिन्यापेक्षा अधिक काळ आरोपींपर्यंत पोहोचण्यास अडथळे येत होते. पोलीस यंत्रणा तपास करत असतानाच मुख्य आरोपीचे दरोडा व चोर्या यासारख्या गुन्ह्यांचे चित्रपटांबद्दल असलेले वेड समोर आले. बँक दरोडा आणि चोरीच्या अनेक वेब सिरीज व चित्रपट पाहिले असता पैसे कचर्याच्या ढिगार्यात नेण्यासाठी एसी डक्ट गॅस कटरने कापून मोठा करून आणि सीसीटीव्ही फुटेजशी छेडछाड करून त्याने संपूर्ण चोरीची योजना कशी आखली हे पोलिसांना समजू लागले. शिवाय चोरी करताना पकडले जाऊन नये म्हणून चेहरा लपण्यासाठी आरोपी अल्ताफ शेख हा बुरखा वापरत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आणि बिंग फुटले. विशेष म्हणजे आरोपी शेखने बँकेतील अलार्म देखील निष्क्रिय करून ठेवले होते, तर व्हॉल्ट दोन चाव्यांनी उघडला गेला ज्या एकाच वेळी वापरल्या जाणार होत्या. तो कस्टोडियन मॅनेजर असल्याने तो चाव्या बनवू शकत होता. अलार्म निष्क्रिय केल्यानंतर आणि सीसीटीव्हीची तोडफोड केल्यानंतर त्याने तिजोरी उघडली आणि रोख एसी डक्टमधून इमारतीच्या मागच्या बाजूने टाकली. एवढे करूनही त्याची योजना कधीही पळून जाण्याची नव्हती. त्याचा असा विश्वास होता मात्र पोलिसांनी गुन्ह्याचा यशस्वी तपास लावत आरोपीला गजाआड केले. त्यामुळे बँकेतील मोठा फसवणुकीचा प्रकार सर्वांसमोर आला.
डक्ट 10 इंच रुंद होता. मेटल शीट गॅस कटरच्या साह्याने कापून पाच ते सहा इंच रुंद केले. तिजोरी रिकामी असताना त्याचे व्हिडीओ काढले. अलार्म सिस्टम सदोष असताना काही सीसीटीव्ही निकामी झाले आहेत आणि ते निष्क्रिय केले जाऊ शकतात हे अल्ताफ शेख याला माहीत होते. बँकेच्या समोर सुरक्षा रक्षकच होते, तर मागच्या बाजूला कोणीही नव्हते. त्याने त्याच्या वरिष्ठांचे लॉगिन तपशील देखील मिळवले. शनिवारी इतर कर्मचारी निघून गेल्यावर त्याने सीसीटीव्ही कॅमेर्यांमध्ये लॉग इन करून त्यांना थांबवले आणि स्क्रीनवर तिजोरी रूमचे फुटेज चिकटवले. काही काळ ते टेम्परिंग ठेवले जेणेकरून तिजोरीची मॉनिटर पाहणार्या सुरक्षा रक्षकाला तिजोरी रूममध्ये कुणी नसल्याचे दिसून येईल, असा कट रचून त्याने चोरी केल्याचे तपासात समोर आले.