ठाणे : वादळीवार्‍यांमुळे नौका आल्या किनारी

ठाणे : वादळीवार्‍यांमुळे नौका आल्या किनारी

पालघर; बाबासाहेब गुंजाळ :  पालघर जिल्ह्यातील पालघरसह डहाणू, वसई तालुक्यात मच्छीमारांचे मोठे वास्तव्य आहे. एकट्या वसई तालुक्यात सुमारे हजारच्या आसपास मच्छीमार नौका आहेत. नुकतेच 1 ऑगस्टला मच्छीमार हंगामाला पुन्हा सुरूवात झाली होती. परंतु उघडीप घेतलेल्या पावसाने पुन्हा वादळी वार्‍यासह हजेरी लावल्याने समुद्रही खवळला आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हा प्रशासनानेही मच्छीमारांनी समुद्रात जावू नये असा सतर्कतेचा इशारा दिला. त्यामुळे बहुतांशी मच्छीमार नौका मंगळवारी उशिरापर्यंत किनारी परतल्या. एकंदरीतच हाही हंगाम तोट्यात जाणार कि काय? अशी भीती मच्छीमार व्यक्त करत आहेत.

पावसाळा सुरू होताच मच्छीमार आपल्या नौका किनार्‍यावर ओढतात. यासाठी एका मोठ्या नौकेला 50 ते 60 हजार रुपये
खर्च येतो. तेवढाच खर्च पुन्हा नौका समुद्रात लोटण्यासाठी येत असतो. पावसाने उघडीप घेतली होती. त्यातच 1 ऑगस्टपासून मच्छीमार हंगाम पुन्हा सुरू झाला. यामुळे मच्छीमारांनी नौका समुद्रात लोटल्या होत्या. मात्र पुन्हा पावसाने वादळी वार्‍यासह हजेरी लावल्याने समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका माघारी आणल्या आहेत. यामुळे पुन्हा रिकाम्या हाताने नौकेवरील तांडेल, खलाशांना परतावे लागले आहे. यामुळे पुन्हा केलेला खर्च वाया गेला आहे.

वादळात मासेमारी करणे धोक्याचे असल्याने मच्छीमारांनी आपल्या बोटी पुन्हा किनार्‍यावर आणण्यास सुरुवात केली आहे. दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर मच्छीमारांनी आपल्या बोटी मासेमारी साठी खोल समुद्रात रवाना केल्या होत्या. मात्र मागील दोन दिवसांपासून समुद्रात निर्माण झालेल्या वादळीवार्‍यामुळे मच्छीमारांना आपल्या माघारी आणाव्या लागल्या आहेत.

वसई पश्चिमेतील अर्नाळा, वसई, नायगाव, पाचूबंदर, किल्लाबंदर या भागातील मोठ्या संख्येने कोळी बांधव मासेमारीचा व्यवसाय करतात. वसईत हजारच्या आसपास नौका आहेत. मासेमारीसाठी जाण्यासाठी योग्य ती नौकांची डागडुजी, मासेमारी केल्यानंतर लागणारा बर्फ, विणलेली जाळी, बोटीसाठी लागणारे इंधन, जीवनावश्यक वस्तूंची जमवाजमाव करून मच्छीमारांनी आपल्या बोटी खोल समुद्रात मासेमारी साठी नेल्या होत्या. यंदाच्या मासेमारीची सुरवात तरी चांगली होईल अशी आशा होती. मात्र मागील दोन दिवसांपासून समुद्रात
वादळी वारे सुरू झाले आहे.

वादळात मासेमारी करणे धोक्याचे असल्याने मच्छीमारांनी आपल्या बोटी पुन्हा किनार्‍यावर आणण्यास सुरुवात केली आहे. पाचूबंदर, नायगाव, अर्नाळा अशा विविध किनार्‍यावर बोटी परत आल्या आहेत. मंगळवारी अर्नाळा किनार्‍यावर संध्याकाळी सहा वाजता काही नौका किनार्‍यावर येवून स्थिरावल्या. मासेमारीसाठी गेलेल्या उर्वरित नौका रात्री अकरा ते बारा पर्यंत किनार्‍यावर येण्याची शक्यता असून सर्व बोटी स्थानिकांच्या संपर्कात असल्याचे अर्नाळा येथील नागरिकांनी सांगितले आहे. या अचानक उद्भवलेल्या वादळाने अस्मानी संकटच नव्या मासेमारी हंगामात मच्छीमार बांधवांवर कोसळले आहे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news