ठाणे : बदलीच्या आदेशाला सहायक आयुक्तांकडून केराची टोपली

ठाणे : बदलीच्या आदेशाला सहायक आयुक्तांकडून केराची टोपली
Published on
Updated on

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेच्या कळवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त समीर जाधव यांची वर्तकनगर प्रभाग समिती व वर्तकनगरचे सहायक आयुक्त सचिन बोरसे यांची वागळे प्रभाग समितीत बदली करण्यात आली आहे. मात्र बदली होऊनही हे अधिकारी आपल्या कर्तव्यावर हजर झालेले नसल्याने प्रशासनाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 24 तासांच्या आत कर्तव्यावर हजर न झाल्यास पालिका प्रशासनाने त्या दोघांना पुन्हा शासनाकडे पाठविण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती समोर
आली आहे. या दोघांनी जुन्याच ठिकाणी आपले कर्तव्य कायम ठेवण्यासाठी राजकीय मंडळीकरवी दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू
केल्याचीही माहिती सुत्रांनी दिली.

ठाणे शहरात बेकायदा बांधकामांचे पुन्हा पेव फुटले असून या बेकायदा बांधकामांवरून पालिकेवर टीका होत आहे. असे असतानाच पालिका प्रशासनाने सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या केल्या. वर्तकनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांची
वागळे प्रभाग समितीत बदली करण्यात आली असून याशिवाय त्यांच्याकडे परवाना विभाग, क्लस्टर सेलचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. तर, कळवा प्रभाग समतिीचे सहाय्यक आयुक्त समीर जाधव यांची वर्तकनगर प्रभाग समितीत बदली करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे निवडणुक विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

ठाणे महापालिकेत बदली झालेले सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना कळवा प्रभाग समिती देण्यात आली आहे. त्यानुसार ते आता प्रभाग समितीत हजर झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे या सहाय्यक आयुक्तांनी अतिरिक्त पदभारासह सोपविण्यात आलेल्या विभागांचा कार्यभार तात्काळ स्विकारु न अनुपालन अहवाल सादर करावा, असे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी दिले होते. मात्र ते हजर न झाल्याने पुढील 24 तासात हजर राहण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. त्यानंतरही हे दोघेही बदलीच्या ठिकाणी हजर झाले नसल्याची माहिती पालिकेने दिली.

शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस केली जाणार

आता पालिकेकडून पुढील पावले उचलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यांना पुन्हा शासनाकडे पाठविण्यासाठी पालिका आता राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करणार आहे. तसेच त्यांच्या कार्यकाळात त्यांच्याकडून झालेल्या कामाची माहिती देखील त्यात दिली जाणार असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारसही केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे या
दोनही सहायक आयुक्तांनी आता आपल्याकडे पूर्वीचीच प्रभाग समिती राहावी या उद्देशाने राजकीय मंडळींकडे जोडे झिजवण्यास सुरवात केली असून त्यांच्याकडून आपल्याला हवी असलेली प्रभाग समिती मिळू शकते, असा विश्वास त्यांना वाटत आहे. त्यामुळेच तेबदलीच्या ठिकाणी हजर राहत नसल्याचे दिसून आले आहे.

दोन्ही सहायक आयुक्तांना बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या
आहेत. मात्र तरीही त्यांनी पदभार न स्वीकारल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस
बजावण्यात आली आहे. तरीही बदलीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत तर त्यांच्यावर
शिस्तभंगाची तसेच पुन्हा शासनाकडे पाठवण्याची शिफारस होऊ शकते.
– संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त, ठामपा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news