

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण पश्चिमेतील घास बाजार अण्णासाहेब वर्तक रोड परिसरातील शफिक खाटी मिठी इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेला पहाटे साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत आजी नातीचा दुदैवी मृत्यू झाला. खातीजा हसम माईमकर (७०), इब्रा रौफ शेख (२२) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कल्याण पश्चिमेतील घास बाजारातील अण्णासाहेब वर्तक रस्त्यावरील शफिक खाटी मिठी इमारतीमध्ये तिसऱ्या माळ्यावर खातीजा आणि इब्रा या आजी, नाती राहत होत्या. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास या भागाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजपुरवठा सुरू झाल्यावर माईमकर यांच्या घराला अचानक आग लागली. थंडीचे दिवस असल्याने आजी खातीजा, नात इब्रा गाढ झोपेत होत्या. आगीने रौद्ररुप धारण करताच त्यांनी बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. भीषण आग, धूर असल्याने त्या कोंडल्या गेल्याने त्या गुदमरून आणि होरपळून मरण पावल्या. त्यांना बचावाची संधी मिळाली नाही. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, या आगीत सदनिकेचे संपूर्णपणे नुकसान झाले. बंदिस्त घरात आग लागल्याने सुरुवातीला रस्त्यावरील वाहनचालक वा पादचाऱ्यांला आग दिसली नाही. परिसरातील शेजाऱ्यांना उशिरा धूर आणि आगीची जाणीव झाली. त्यानंतर मात्र रहिवाशांची पाचावर धारण बसली. होरपळलेल्या आजी आणि नातीला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
किचनपर्यंत पोहोचलेल्या आगीचे स्वरुप पाहता शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती अग्रिशमन दलाचे अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. बाजारपेठ पोलीस या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करत आहेत. या दुर्घटनेने कल्याणमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.