ठाणे : क्रांतिवीरांच्या आठवणी जागवतेय ठाणे कारागृह

ठाणे : क्रांतिवीरांच्या आठवणी जागवतेय ठाणे कारागृह
Published on
Updated on

ठाणे; दिलीप शिंदे :  भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे, क्रांतिवीर अनंत लक्ष्मण कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे, विनायक नारायण देशपांडे यांना ब्रिटिशांनी ठाणे मध्यवर्ती कारागृहात फाशीवर चढविले होते. ते फाशी गेट आजही क्रांतिवीरांच्या बलिदानाची साक्ष देत उभा आहे. याच कारागृहात हजारो स्वातंत्र्यसैनिकांना ठेवण्यात आले होते.  आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी अंदनामला पाठविण्यात आले. तो ऐतिहासिक दरवाजाही कारागृहात साक्ष देत आहे. स्वातंत्र्य समराच्या इतिहासाची साक्ष देणार्‍या या वास्तू इतिहासप्रेमी, सर्वसामान्य नागरिकांना 'याची देही, याची डोळा' अनुभवण्यासाठी खुले करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने करावी, अशी अपेक्षा इतिहासप्रेमींकडून व्यक्‍त होत आहे.

ठाणे मध्यवर्ती कारागृह ही 292 वर्षांपूर्वीची एक ऐतिहासिक वास्तू आहे. 1730 मध्ये हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला. मार्च 1737 मध्ये मराठा साम्राजातील सरदार चिमाजीआप्पा यांनी किल्ला काबीज करून या किल्ल्यासह ठाणे परिसर पोर्तुगीजमुक्‍त केला. पुढे डिसेंबर 1744 रोजी ब्रिटिशांनी हा किल्ला सर केला. याच किल्ल्यात 1816 मध्ये पेशवाईचे कारभारी त्र्यंबकजी डेंगळे यांना बंदिवान ठेवण्यात आले. ते बहुदा या किल्ल्यातील पहिले कैदी म्हणता येतील. तसेच या किल्ल्यातील कारागृहातून अतिशय हुशारीने पळणारे पहिले कैदी म्हणूनही डेंगळे यांचे नाव घ्यावे लागते. ब्रिटिशांनी किल्ल्यातील अंतर्गत रचना बदलून 1833 मध्ये किल्ल्याचे रूपांतर पूर्णपणे कारागृहात केले. 1844 मध्ये जिल्हा न्यायाधीश तुरुंगाची पाहणी करण्यासाठी आलेले असताना, कैद्यांनी त्यांना पकडून मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर 1876 मध्ये तुरुंगाचा कायापालट करण्यात आला.

नाशिक जिल्ह्यात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा पुकारणारे राघोजी भांगरे यांना ठाणे कारागृहात 2 मे 1848 रोजी फाशी देण्यात आली. नोव्हेंबर 1879 ते जून 1880 या काळात आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना याच तुरुंगात ठेवण्यात आले होते. 1909 मध्ये विनायक दामोदर सावरकर यांना ब्रिटिश न्यायालयाने काळ्या पाण्याची (अंदमान) शिक्षा ठोठावली. अंदमानला पाठवण्याआधी सावरकरांना ठाण्याच्या कारागृहात ठेवण्यात आले. येथून त्यांना बोटीने अंदमानला पाठविण्यात आले.

सावरकरांवरील अन्यायाचा निषेध म्हणून 19 वर्षीय अनंत लक्ष्मण कान्हेरे, 23 वर्षीय कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि 21 वर्षीय विनायक नारायण देशपांडे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध केला. या तीन क्रांतिकारकांना 11 एप्रिल 1910 रोजी ठाणे कारागृहात फाशी देण्यात आली. त्यांचे मृतदेहच काय; पण त्यांची राखही त्यांच्या नातेवाईकांना मिळणार नाही, अशी व्यवस्था ब्रिटिशांनी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news