

डोंबिवली; भाग्यश्री प्रधान-आचार्य : ए जरा ते लाईट नीट लागत नाहीत, वायर तपासून घ्या. मंडपाचे कापड घट्टच लागलं पाहिजे. रस्त्यांवर खड्डे आहेत रे गणपतीची मूर्ती कारखान्यातून आणताना जपून आणा अशा एक ना अनेक सूचना देणे एका गणेश मंडळात सुरू होते. या सूचना देत होते चक्क विजय तरुण मित्रमंडळाचे अध्यक्षपद भूषविणारे आणि मुस्लिम बांधव असणारे नदीम आगा. त्यामुळे कल्याणच्या या मंडळाने हिंदू-मुस्लिम ऐक्य जपत सणवार साजरे करून भारताच्या परंपरेचा वसा खर्या अर्थाने सांभाळला असून या मित्र मंडळात राम रहीम एकत्र नांदत असल्याचे पाहायला मिळते.
गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली. सण उत्सवाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र यावे हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. त्यांनतर स्वातंत्र्य मिळाले राजकीय, आर्थिक, सामाजिक अनेक बदल पाहायला मिळाले. यामध्ये अनेक वेळा धर्मां मधील भांडणामुळे समाजात तेढ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र भारत हा सर्व धर्म समावेशक देश असल्याने येथे सर्व सुखाने धर्म एकत्र नांदताना दिसून येतात. कल्याण शहर या सगळ्या इतिहाचे साक्षीदार असलेले शहर आहे. या शहरात असलेल्या रामबाग येथील दत्तमंदिराजवळ आलेल्या विजय तरुण मित्रमंडळ गणेशोत्सवाचे मुस्लिम बांधव असणारे नदीम आगा गेल्या वीस वर्षांपासून या गणेशोस्तव मित्र मंडळाचे
अध्यक्षपद भूषवत आहेत
आजूबाजूला असणार्या वातावरणात रमणार्या नदीम भाईंनी लहानपणापासूनच ईद, गणपती, दिवाळी एकत्र साजरे करताना पाहिले आहे.
याच चाळीत विजय तरुण मित्रमंडळाच्या बाप्पाचे गेल्या 57 वर्षापासून आगमन होत आहे. हे मंडळ सुरू करण्यात आयुप शेख या आणखी एका मुस्लिम बांधवांचा वाटा असल्याचे नदीम आगा सांगतात. त्यामुळे या मंडळाशी एक वेगळे घट्ट नाते आहे. गणपती बाप्पाच्या
आगमनासाठी आम्ही सारेच अतुर असतो. इतकेच नव्हे तर बाप्पाच्या आरास सजावटीसाठी विविध सामाजिक विषयावर भाष्य करणारे देखावे उभारत असल्याचे नदीम भाई सांगतात.
गणेशोत्सव चैतन्य वाढवतो आणि बाप्पा वर्षभर पुरेल इतका उत्साह देऊन जातो असे नदीम आगा सांगतात. शिवजयंती उत्सव देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात साजरे करत असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख करताना आपल्याला कधीही हिंदू मित्रांकडून दुजाभावाची वागणूक मिळाली नाही असे त्यांनी पुढारीशी बोलताना सांगितले.