

ठाणे; पुढारी डेस्क : कल्याण रेल्वेस्थानकातून अडीच वर्षांच्या बालकाचे अपहरण करणार्या मानलेल्या बहीण-भावाला गुरुवारी
बेड्या ठोकण्यात आल्या. या गुन्ह्याची उकल अवघ्या 6 तासात करण्यात कल्याण लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. हे आरोपी हाती लागल्याने मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आंधळे यांनी दै. 'पुढारी'ला सांगितले.
मूळची बिहार राज्याची असलेली संजूदेवी राजवंसी ही अडीच वर्षांचा मुलगा अक्षय याच्यासोबत कल्याणमध्ये आली होती. नोकरीच्या शोधात असलेली संजूदेवी 4 दिवसांपासून कल्याण स्थानकातील फलाट क्र. 2 वर राहत होती. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास भूक लागल्याने ती झोपलेल्या मुलाला फलाटावर सोडून वडापाव आणण्यासाठी स्थानकाबाहेर गेली. काही वेळात ती परत आली असता झोपलेला मुलगा बेपत्ता असल्याचे पाहून ती हादरली. स्थानकात मुलाचा सर्वत्र शोध घेतला; मात्र तो कोठेच भेटला नाही. अखेर तिने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला.
वपोनि अविनाश आंधळे, पोनि अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने मुलाचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एक महिला व पुरुष त्या मुलाला रिक्षाने घेऊ न जाताना दिसून आले. त्यानुसार सपोनि प्रमोद देशमुख
व गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने रिक्षा चालकाचा शोध घेतला. रिक्षा चालकाने सांगितल्यानुसार तपासी पथकाने उल्हासनगर परिसरातल्या चोपडा कोर्ट येथून आरोपी पूजा मुंडे (26) व अमित शिंदे (20) यांना ताब्यात घेतले व अक्षय याची सुखरूप सुटका केली. या प्रकरणी अपहरणाच्या गुन्ह्यांतर्गत या दोघांनाही अटक करण्यात आली आहे