

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : तुमचा मुख्यमंत्रीच ठाणेकर असल्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ठाण्याच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. मुंबईप्रमाणे ठाणेही आंतरराष्ट्रीय स्तरावरील शहर करा असे आदेशच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला शनिवारी दिले.
'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' या उपक्रमाअंतर्गत शनिवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते कळवा येथील खाडी किनारा विकास प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. ही वॉटरफ्रंट ठाणेकरांसाठी नवे आकर्षण ठरणार आहे. ठाणेकरांच्या सेवेत ११ इलेक्ट्रिक बसेस देखील मुख्यमंत्र्यांनी दाखल केल्या. गावदेवी मैदानाच्याखाली उभारण्यात ालेल्या भूमिगत पार्किंगचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. तसेच ज्ञानसाधना महाविद्यालय येथील उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील लेबर वॉर्ड आणि वागळे येथील भव्य चौकाचे उदघाटन मुख्यमंत्र्यांनी केले. लागेल तो निधी ठाण्यासाठी दिला जाईल. मात्र, रस्ते, प्रकल्प चांगल्या दर्जाचे झाले पाहिजे, जे कामात कसूर करत असतील त्यांच्यावर कारवाई करा, हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. अधिकाऱ्यांनी चांगली भावना जपली पाहिजे शहरांचा विकास होईल अशी अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत असे आवाहन करताना त्यांनी येत्या अडीज वर्षात महामुंबई खड्डेमुक्त करण्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, फ्री वे चा रस्ता हा ठाण्यापर्यंत आणत आहोत, शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बायपास रस्ता करत आहोत. दोन वर्षांनी ठाण्यात कोणी बाहेरचा माणसू आला तर त्याला ठाणे लक्षातच येणार नाही असा विकास ठाण्यात करा असे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले. या कार्यक्रमाला खा. डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, पालिका आयुक्त अभिजित बांगर, नरेश म्हस्के आदी मान्यवर उपस्थिती होते.
क्लस्टरला लवकरच सुरवात क्लस्टरचा विकास लवकर केला जाणार आहे, यासाठी सिडको ला सोबत घेतले आहे, अडचणी दूर केल्या आहेत, त्यामुळे तातडीने या कामाला प्राधान्य देऊन सुरवात करा असेही त्यांनी सांगितले. आपल्याला संक्रमण शिबिरात राहावे लागेल अशी नागरीकांना भिती वाटत आहे. मात्र त्यांना तेथे न राहता थेट हक्काच्या घरांच्या चाव्या दिल्या जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.