

ठाणे : कल्याण पूर्वेतील मलंगगड पट्ट्यात एमडी विक्रीसाठी आलेल्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने मलंगगडरोड वरील भाल गावाजवळ ही कारवाई पार पडली. जय रेवगडे (२१) , साहिल कांगणे (२४) अशी संशयित आरोपींची नावे असून त्यांच्याकडून १७ लाखांचा ड्रग्स हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने पुढील तपासून सुरु केला आहे.
कल्याण मलंगगड रोड वरील भाल गावच्या सीताराम म्हात्रे नगर या परिसरातून ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल १७ लाखांचा मेफेड्रोन हे अमली पदार्थ जप्त केले आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जय संजय रेवगडे आणि साहिल किरण कांगणे या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांकडे अमली पदार्थ सापडल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. विशेष म्हणजे उल्हासनगर परिमंडळ - ४ च्या क्षेत्रात गेल्या काही दिवसात अमली पदार्थांचे सेवण आणि विक्रीबाबत अनेक गुन्हे दाखल होत असताना ही कारवाई गुन्हे शाखेने केल्याने स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्चचिन्ह उपस्थित होते आहे. विशेष बाब म्हणजे ज्या परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली आहे त्या परिसरात कॉलेज देखील आहे. त्यामुळे हे नशेचे पदार्थ कुठे विक्री केले जाणार होते ? याचा शोध घेण्याचे आव्हान तपास अधिकाऱ्यांसमोर असणार आहे.
एकीकडे गुन्हेगारी वाढत चालली असून गेल्या काही दिवसांपासून परिमंडळ - ४ मध्ये अमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात अमली पदार्थाच्या आहारी तरूण पिढी गेल्याचे दिसून आले आहे. सार्वजनिक शौचालय, मोकळी मैदाने, निर्जन ठिकाणी अनेक तरूणांना पोलिसांनी अमली पदार्थ असलेल्या गांजा सेवन करताना पकडले आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. अंबरनाथमध्ये अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याचा आरोप सामाजिक संघटना आणि नागरिकांनी केला होता. त्यानंतर भगतसिंग नगर परिसरात एकाच आठवड्यात दोनदा कारवाई करण्याची वेळ पोलिसांवर आली. यातही हजारो रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. उल्हासनगर परिमंडळ ४ च्या क्षेत्रात या घटना सातत्याने होत असताना पोलिसांकडूनही कारवाई होते आहे. मात्र असे असतानाही अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी ते पदार्थ बाळगण्याचे प्रकार समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार भाल गावातील गुरूकूल हायस्कुलजवळ सिताराम म्हात्रे नगर, चिकणकर वीटभट्टी जवळ मलंगगड रस्त्यावर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली. या कारवाईत कल्याण येथे राहणाऱ्या जय संजय रेवगडे याला ६३.६ ग्रॅम वजानाचा मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. या मेफेड्रोनची किंमत १२ लाख ७२ हजार इतकी आहे. तर किरण कांगणे याने आपल्या ताब्यात २१.५ ग्रॅम वजनाचा ४ लाख ३० हजार रूपये किमतीचा मेफेड्रोन हा अमली पदार्थ बाळगला म्हणून त्यालाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांच्या डोळ्याखालून ही बाब कशी सुटली असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.