

ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर परिसरात शुक्रवारी एका माकडाला स्टीलच्या बाणाने मारण्यात आले आहे. वन्यजीव प्राणी कल्याण संस्थेने जखमी अवस्थेतील माकडाला वाचवले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संरक्षित वनक्षेत्रात किंवा त्याच्या आसपास कार्यरत असलेल्या बेकायदेशीर आस्थापनांच्या गैरप्रकारांच्या बाबतीत कारवाई करण्याची गरज पर्यावरण अभ्यासक व कार्यकर्ते रोहित जोशी व पवन शर्मा यांनी केली आहे. माकडावरील या हल्ल्याच्या घटनेमुळे शहराच्या मध्यभागी असलेल्या या हिरव्यागार परिसरात पशु क्रूरता आणि बेकायदेशीर कामांचा एक चिंताजनक प्रकार समोर आला आहे.
येऊरमध्ये अनेक बेकायदेशीरपणे चालणाऱ्या स्टड फार्म आणि टर्फ तसेच घोडेस्वारी, तिरंदाजी यांसारख्य साहसी खेळांचे प्रशिक्षण दिले जाते, स्पर्धा आयोजित केल्या जातात. येऊर परिक्षेत्रातील चालणाऱ्या बेकायदेशीर टर्फ क्लब व अन्य कृत्यांबद्दल संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे कार्यकारी सदस्य रोहित जोशी यांनी या चिंता व्यक्त केली. ज्याने कोणी हे कृत्य केले असेल त्याला शोधून दंडित करणारच, इतकेच नाही तर समितीतील सर्व भागधारक, वन विभाग, ठाणे महानगरपालिका, ठाणे पोलीस, स्थानिकांच्या सहकार्याने येथील सर्व बेकायदेशीर आस्थापनाना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. माकडाला त्यांच्या फार्म किंवा बंगल्यात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी मारण्यात आले असावे, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
या गैरकृत्य प्रकरणी एक तातडीची बैठक बोलावण्यात आली असून ठाणे महानगरपालिका, पोलीस विभाग, स्थानिक आदिवासी समुदाय आणि प्राणी बचाव व कल्याण स्वयंसेवी संस्थांचे सदस्य उपस्थित असतील. या बैठकीत येऊर ईएसझेडमधील सर्व बेकायदेशीरपणे कार्यरत आस्थापनांना त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी एक सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यावर चर्चा केली जाईल. याव्यतिरिक्त, तपासामध्ये ईएसझेडच्या सीमेवर असलेल्या खाजगी बंगले आणि मालमत्तांची देखील चौकशी केली जाईल.
असा संशय आहे की, माकडाला त्यांच्या फार्म किंवा बंगल्यात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी मारण्यात आले असावे. या आस्थापनांवर देखील समितीची नजर असेल, जेणेकरून ते अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी नाहीत किंवा त्यांना प्रोत्साहन देत नाहीत याची खात्री करता येईल. येऊरच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांचे, तसेच येथील वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासांचे संरक्षण करण्यासाठी निसर्गप्रेमी ठाणेकरांच्या सहभाग अत्यंत आवश्यक आहे. माकडावर स्टीलच्या बाणाने प्रहार केल्यानंतर हा बाण त्या माकडाच्या शरीरात आरपार घुसला. या अमानुष कृत्याने सारेच संतप्त झाले आहे.