

डॉ. महेश केळुसकर
आज मे महिन्याचा पहिला रविवार 3 मे 2026 रोजी येत असल्यानं, आज जागतिक हास्यदिन साजरा केला जाईल. तुम्ही म्हणाल, काय हसून काय करणार? उगाचच हसायला आम्ही काय येडे वाटलो काय तुम्हाला? नाय बाबा. येडे नाय तुम्ही. पण तुम्ही जर शहाणे असाल, तर रोज हसाल...
आजूबाजूला बघताय ना मंडळी, किती मानसिक तणाव वाढलाय? साध्या साध्या कारणावरून लोक चिरडीला येतायत आणि समोरच्याला ठोकायचं हेच उद्दिष्ट ठेवून दंगे करतायत. भाजीत मीठ कमी पडलं, नवऱ्यानं भांडण केलं म्हणून बायकोनं नवऱ्याच्या डोक्यात लाटणं मारलं किंवा कॉलनीतल्या सगळ्या मोटरबाईक्सना अचानक मध्यरात्री आग लावली गेल्यानं त्यांचा कोळसा झाला, अशा प्रकारच्या बातम्या आपण वाचतो. राजकारणात तर विचारूच नका.
साध्या साध्या कारणावरून लोक सोशल मीडियावर जणू मोठी लढाई करायची या आवेशात समोरच्यावर तुटून पडतात व इथूनच वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक अस्वस्थता निर्माण होते. हे सगळं तणावामुळे होतंय असं मनोवैज्ञानिक म्हणतात. तणावाची कारणं अनेक आहेत. पण, यावर उपाय आहे ना. हास्य हे सर्वोत्तम औषध आहे या तणावावर. म्हणूनच हसा आणि हसवा या मंत्राद्वारे जग अधिक आनंदी बनवण्यासाठी हास्यदिन साजरा केला जातो.
हसण्यामुळे कॉर्टिसोल पातळी कमी होते व मूड सुधारतो. हसणं हृदय आणि फुफ्फुसांसाठी फायदेशीर आहे. खोल हसण्याने फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि रक्ताभिसरण सुधारतं, ज्यामुळं हृदयाचं आरोग्य सुधारतं. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. शरीरातील रोगप्रतिकारक पेशींना हास्य सक्रिय करतं, ज्यामुळे रोगांशी लढण्याची क्षमता वाढते.
मराठी साहित्यात हास्य रस हा अत्यंत लोकप्रिय, समृद्ध रस आहे. विसंगती, विडंबन, उपहास आणि मिश्कील स्वभावामधून हा रस निर्माण होतो. हास्य रसाचा मूळ स्थायीभाव हास्य (विनोद) हा आहे. एखाद्या व्यक्तीची विचित्र वेशभूषा, विसंगत वागणं, असंबद्ध बोलणं किंवा चेष्टा-मस्करी यांतून हा रस वाचकांच्या, प्रेक्षकांच्या मनात निर्माण होतो.
मराठी चित्रपटांमध्ये दामुअण्णा मालवणकर, दादा कोंडके, शरद तळवलकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आदी अभिनेत्यांनी प्रेक्षकांना भरपूर हसवलं. अनेक लोकांचा चित्रपट पाहण्याचा किंवा नाटक पाहण्याचा हेतू हा असतो की चार घटका आपल्या व्यथा-वेदना विसराव्यात आणि त्या चित्रपटाच्या प्रसंगांमध्ये किंवा नाटकांच्या घटनांमध्ये रंगून जावं, खळखळून हसावं आणि आपला ताण हलका करावा.
मराठी रंगभूमीवर अनेक विनोदी नट व नट्या होऊन गेल्या. एकेकाळी आचार्य अत्रे यांची साष्टांग नमस्कार, भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी यासारखी नाटकं प्रचंड हास्यविनोद असल्यामुळे लोकप्रिय झाली. त्याआधी त्यांचे गुरू राम गणेश गडकरी यांनीही आपल्या नाटकांमधून विनोदाच्या फुलझड्या उडवल्या. गंगाराम गवाणकर लिखित वस्त्रहरण या मालवणी नाटकातील प्रसंग, दिग्दर्शक रमेश रणदिवे यांनी अधिक विनोद घालून फुलवले व मच्छिंद्र कांबळी यांनी तर आपल्या हजरजबाबी विनोद बुद्धीमुळे वस्त्रहरणच्या लोकप्रियतेचा एक विक्रमच निर्माण केला.
पु. ल. देशपांडे मराठी साहित्य विश्वात भाई म्हणून ओळखले जातात. त्यांची बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली, असा मी असामी ही पुस्तकं हास्य रसाचा उत्कृष्ट नमुना आहेत. 80 च्या दशकात विजय तेंडुलकर यांच्या ‘सखाराम बाईंडर’ या नाटकाने प्रचंड खळबळ उडवून दिली. लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भोंदू नैतिकतेनं केलेलं हे आक्रमण पु.ल. देशपांडे यांना सहन झालं नाही. त्यांनी या भंपक संस्कृतीवाद्यांची खिल्ली उडविण्यासाठी व तेंडुलकरांना समर्थन देण्यासाठी श्री भगवान सखाराम बाईंडर नावाचा दीर्घांक लिहिला. पण, तो मंचित करून रंगभूमीवर आणावा, असं कुणाला खूप वर्षात वाटलं नाही.
मंगेश सातपुते या दिग्दर्शकाच्या हातात ते पुलंचं स्क्रिप्ट पडलं आणि सध्या रंगभूमीवर ‘मॅड सखाराम’ या बदललेल्या नावानं क्षणाक्षणाला हास्यस्फोट करत हा दीर्घांक धुमाकूळ घालत आहे. याच दिग्दर्शकानं पु. ल. देशपांडे यांच्या मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास या पुस्तकाची ओळख मराठी रसिकांना करून देण्यास सुप्रसिद्ध विनोदकार आणि पत्रकार मुकेश माचकर यांच्याकडून मराठी वाङ्मयाचा घोळीव इतिहास हा दीर्घांक लिहून घेतला. त्याचा प्रयोग आज हास्यदिनानिमित्त गडकरी रंगायतमध्ये होणार आहे.