

Why are sugarcane workers undergoing hysterectomy?
ठाणे : अनुपमा गुंडे
अंगावरून लय जायचं... पोटात दुखायचं. डॉक्टरकडं गेले, त्यांनी सांगितलं गर्भ पिशवी काढावी लागलं....म्या घाबरले... दुसऱ्या डागदरनं पण तेच सांगितलं. नाहीतर कॅन्सर होण्याचं भ्यावं घातलं... मग मी पिशवी काढून टाकली ७-८ वर्षे झाली पिशवी काढून... पण पिशवी काढल्यापासून माझं अंग थरथरतं... हातपाय चालत नाहीत, वझ्याचं काम तर होतच नाही, त्यामुळं उसाच काम करत नाही...
वयाच्या चाळिशीत असलेली अलका (नाव बदललं आहे) सांगत होती. अलका शाळकरी वयापासून आई-वडिलांसोबत ऊस तोडायला जात असे. उमेदीत अनेक कारखाने ती फिरली. लग्नानंतर पण हेच काम करत आली. पण गर्भाशयाची पिशवी काढली आणि आराम वाटण्यापेक्षा तिच्या शारीरिक त्रासात भरच पडली... आता वाकून ऊस तोडणे जमत नाही. मिळेल ते काम करून गुजराण सुरू आहे. ही अलका एकमेव नाही, तर साखर पट्टयात ऊसतोडणी करणाऱ्या महिलांमध्ये अशा असंख्य अलका आहेत. डॉक्टरने सांगितले म्हणून गर्भाशय काढून टाकत त्या सर्व वेदना सहन करत दरवर्षी उसाच्या थळात शिरतात. गर्भाशय काढले म्हणून होणारे सर्व परिणाम सोसत ऊस तोडता तोडता त्यांच्या आयुष्याचे कधी पाचट होते ते त्यांनाही कळत नाही.
ऊसतोड बायकांनाच का नकोशी होतेय पिशवी?
उपसावे लागणारे अपार कष्ट, अजूनही सर्रास होणारे बालविवाह, बालविवाहानंतर लादले जाणारे बाळंतपण, आर्थिक परिस्थिती अभावी होणारी आहाराची आणि आरोग्याची हेळसांड आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उसाच्या फडावर बाई म्हणून असणारे असुरक्षित वातावरण यामुळे ऊसतोड महिला कामगारांना ऐन तिशी पस्तिशीतच गर्भाशय नको होऊ लागले आहे. गेल्या २७ वर्षांत केवळ ८६७ महिलांनी गर्भपिशव्या काढल्याचे शासकीय आकडेवारी सांगत असली तरी प्रत्यक्षात ही संख्या कितीतरी जास्त आहे. या महिलांनी गर्भपिशव्या आणि गर्भाशय काढण्याची आकडेवारी पुरोगामी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आरोग्य व्यवस्थेला हादरवणारी आहे.
बाईपणाची सशक्त खूण असलेले गर्भाशय आणि गर्भाशयाची पिशव्या काढण्याचे प्रमुख कारण हे ऊसतोड महिला कामगारांना कामाच्या ठिकाणी असलेले असुरक्षित वातावरण आहे. बाईच्या गर्भाशयातल्या कळ्यांवर सामाजिक व्यवस्था घाला घालते, त्याच व्यवस्थेनं आता
बाईच्या गर्भाशयालाही हात घातला आहे. शारीरिक त्रास हे गर्भाशय काढण्याचे मूळ कारण असले तरी वैद्यकीय व्यावसायिकांद्वारे होणारी दिशाभूल, शारीरिक स्वच्छतेचा अभाव, शारीरिक पोषण, मानसिक आधाराचा अभाव यामुळे दिवसाला देशात हजारो गर्भाशये कुठल्या ना कुठल्या कारणाने निकामी केली जात आहेत. महाराष्ट्रात १२ ते १४ लाखांच्या घरात ऊसतोडणी कामगार आहेत, त्यातले सुमारे ५० टक्के कामगार हे बीड जिल्ह्यातील आणि उर्वरित मराठवाड्यातील आहेत.
माझ्या अध्यक्षतेखाली समितीने केलेल्या शिफारसीनुसार उसतोड महिला कामगारांच्या सर्वांगीण सुरक्षेच्या संदर्भात कामगार आणि सहकार विभाग, साखर उपायुक्त, महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभाग तसेच उसतोड महामंडळ यांच्या मार्फत एक सक्षम कायदा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केवळ गर्भाशय हाच मुद्दा नाही तर या महिलांना कामाच्या आणि स्थलांतराच्या ठिकाणी चांगले वातावरण आणि मुलभूत सुविधा असाव्यात, या सर्व बाबींचा समावेश त्यात असेल, यासाठी मी जातीने पाठपुरावा करत आहेत,
डॉ. नीलम गोहे, उपसभापती विधान परिषद.
अंगावरून जाण्याचा त्रास होत असलेली बाई डॉक्टरकडे गेली की तिला पहिला प्रश्न तुमचं वय काय, तुम्हांला मुलं किती हे प्रश्न विचारतात, त्यानंतर त्या बाईला होणारा त्रास हा मुद्दा दुय्यम ठरतो. आता एक बाई म्हणून प्रजोत्पादनाचे काम संपलं आहे, त्यामुळे आता तुम्हांला गर्भपिशवीची गरजच नाही, या विचारानं चाळीशीजवळ पोहोचलेल्या महिलांना सुरूवातीला गोळ्या दिल्या जातात आणि तिला गर्भपिशवी काढण्याचा सल्ला दिला जातो, किंवा सरळ ती शस्त्रक्रिया केली जाते. तिचे समुपदेशन घडतच नाही, हे प्रकार सर्व स्तरातील महिलांच्या बाबतीत घडत आहेत, मोनोपॉज कसा हाताळायचा हे याबद्दल समुपदेशन आपल्याकडे होतच नाही, मनीषा तोकले पुढारीशी बोलत होत्या. त्या महिला किसान अधिकार मंच (मकाम) आणि महिला उसतोड कामगार संघटनेचे काम पाहतात.
मनीषा तोकले म्हणाल्या, उसतोड महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या या घटना तर कठीण आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडणाऱ्या या महिलांवर आपल्या सुरक्षेसाठी गर्भाशय काढण्याची वेळ येते. पण बालविवाहामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक प्रश्नांमुळे, कामाच्या आणि स्थलांतरित जागेत पाणी, शौचालये, पाळीच्या काळात वापरायची साधने या सर्वांचा अभाव असल्यामुळे या महिलांचे आरोग्याचे प्रश्न जटील होतात. ऊसतोड कामगार महिलांसाठीच नाही तर राज्यात सर्वच महिलांना गर्भाशयाच्या आजारांबाबत जागृती होण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक शासकीय रूग्णालयात महिलांचे मोफत समुपदेशन, गर्भाशय चाचण्या आणि उपचार मोफत झाले पाहिजेत, त्यासाठी स्वतंत्र विभाग असला पाहिजे. महिलांना खासगी रुग्णालयाने गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया सल्ला दिला तरी त्याची शहनिशा सरकारी यंत्रणेवर झाली पाहिजे,