

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा
नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेच्या पोटातील गर्भाच्या पोटातही गर्भ वाढत असल्याचे नैसर्गिक आश्चर्य सोनोग्राफी तपासणी दरम्यान आढळून आले आहे. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी, दोन आपत्यांची माता असलेली (३२ वर्षीय) गर्भवती महिला सोनोग्राफी तपासणी करवून घेण्यासाठी आली होती. रुग्णालयातील डॉ.प्रसाद अग्रवाल यांना महिलेच्या सोनोग्राफी तपासणी दरम्यान दुर्मिळातील दुर्मिळ प्रकार दिसून आला. महिलेच्या पोटातील नऊ महिन्यांच्या गर्भाच्या पोटात आणखी एक गर्भ वाढत असल्याचे प्रथमच त्यांना दिसून आले. त्यामुळे डॉ.अग्रवाल आश्चर्यचकित झाले.
गर्भाच्या पोटात गर्भ आढळण्याचा हा प्रकार प्रसुतीबाबत गुंतागुंतीचा व जोखमीचा राहण्याची संभावना असल्याने डॉ.अग्रवाल यांनी या सोनोग्राफी रिपोर्ट बाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भागवत भुसारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ .झिने व महिला रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.पाटील यांनाही अवगत केले. या वरिष्ठ वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सदर महिलेची पुन: सोनोग्राफी तपासणी करण्यात आली. नऊ महिन्याच्या गर्भाची पुर्ण वाढ झालेली आहे, मात्र त्या गर्भाच्या पोटातील गर्भाची वाढ झालेली नाही.
प्रसूती दरम्यान गुंतागुंतीची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता विचारात घेऊन,सदर गर्भवती महिलेची प्रसुती सुलभ व सुखरुप होण्याच्या दृष्टीने आगावूची खबरदारी म्हणून वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्याने महिलेला प्रसूतीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहे.
आज बुलढाणा येथील आमच्या यूएसजी क्लिनिकमध्ये आढळून आलेली केस ही दुर्मिळ अशी आहे. पाच लाख गर्भवती महिलांमागे अशी एक 'केस' आढळून येऊ शकते. त्याला FETUS in FeTO असे म्हटले जाते. आतापर्यंत अशा केवळ २०० केसेस नोंदवल्या गेल्या आहेत, तेही बाळंतपणानंतर (भारतात आजपर्यंत १० ते १५ केसेस नोंद झाल्या आहेत). मला गर्भवती महिलेच्या पोटातील बाळामध्ये काहीतरी असामान्य दिसून आले. तो जवळजवळ ३५ आठवड्यांचा सामान्य वाढणारा गर्भ होता. त्याच्या पोटात काही हाडे आणि गर्भासारखी रचना होती. मला लगेच लक्षात आले की हे सामान्य नाही. ही जगातील सर्वात दुर्मिळ केसेसपैकी एक आहे.
डॉ. भागवत भुसारी, जिल्हा शल्यचिकित्सक, बुलढाणा.