

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील फेज २ मध्ये असलेल्या कंपनीत काम करताना शॉक लागून महिला कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी घडली. अक्षता अजय जाधव (४५) असे मृत कामगार महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून नोंद करून चौकशी सुरू केली आहे.
अक्षता जाधव (४५) या डोंबिवली जवळच्या सोनारपाडा गावातील कृष्णावाडीमध्ये कुटुंबीयांसमवेत राहत होत्या. या संदर्भात कंपनीत काम करणाऱ्या अमृत वाघमारे यांनी पोलिसांना तशी प्राथमिक माहिती दिली.
या संदर्भात पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनारपाडा परिसरात सद्गुरू कोटिंग नावाची कंपनी आहे. या कंपनीत अनेक महिला काम करतात. गुरूवारी नेहमीप्रमाणे अक्षता जाधव या त्यांच्या सहकारी महिला कामगारांसमवेत कोटींगचे काम करत होत्या. इतक्यात अचानक यंत्रातून आलेल्या विजेच्या धक्क्याने त्या बेशुध्द पडल्या. बेशुद्धावस्थेत त्यांना तात्काळ जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी अमृता जाधव यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत पाटील अधिक तपास करत आहेत.