

Titwala Illegal Constructions
टिटवाळा : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कार्यपद्धतीवर सध्या मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. वाढत्या अनधिकृत बांधकामांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी म्हणजेच बकरी ईदच्या दिवशी अचानक जेसीबी फिरवत 'धडक कारवाई'चा देखावा उभा केला. मात्र ही कारवाई प्रत्यक्षात केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारी 'नाट्यमय स्क्रिप्ट' असल्याचा ठपका आता जागरूक नागरिकांकडून लावला जातोय.
बल्याणी, उंभार्णी, वासुंद्री रोडवरील बांधकामांवर कारवाई झाली खरी, पण हीच कामे महिन्यांपासून खुलेआम सुरू असताना महापालिका झोपेत होती का? हे प्रश्न अधिकच तीव्र होत आहेत.
दुसरीकडे, विनायक आशिष अपार्टमेंट परिसरात महेश गोयल नामक विकासकाने पार्किंगमध्ये १० गाळे उभारल्याच्या तक्रारींवर देखील आयुक्तांनी सुनावणी घेतली, आदेशही दिले पण प्रत्यक्ष कारवाई मात्र शून्य! त्यामुळे इथे आर्थिक देवाणघेवाण झाली असल्याची कुजबुज सुरू झाली आहे. या एकांगी कारवाईच्या विरोधात आता नागरिक आयुक्तांची भेट घेऊन अधिकृत निवेदन सादर करणार असून, महापालिकेच्या ढिसाळ आणि निवडक कारभाराला वाचा फोडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. कारवाई ही केवळ देखाव्यासाठी नको ती नियमबद्ध, वेळेवर, आणि सर्वांवर समान असली पाहिजे.
या कारवाईच्या संपूर्ण स्वरूपावरून स्पष्ट होते की, प्रशासनाकडून हा गंभीर प्रश्न मुळासकट उपटण्याचा प्रयत्नच नाही. कारवाईचे उद्दिष्ट केवळ दिसायला काहीतरी केले इतकेच मर्यादित होते. नागरिक प्रश्न विचारत आहेत की, सीआरझेडमध्ये रिंगरूट रस्त्यालगत चालणारी धाब्यांची, गोडाऊन, हॉटेल्सची आणि दुकानदारांची अतिक्रमणे कशी काय 'कायम राहतात ? या सर्व पार्श्वभूमीवर मोठ्या आर्थिक सौद्याच्या वाटाघाटी होत असल्याची चर्चा सुरू आहे. एखाद-दुसऱ्या ठिकाणी अर्धवट जोती तोडून जेव्हा माफियांना पुन्हा बांधकाम सुरू करण्याची मोकळीक दिली जाते, तेव्हा ही कारवाई खेळ चालू असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.