कल्याण-डोंबिवली वाहतूक कोंडीच्या शापातून मुक्त केव्हा होणार?

कल्याण-डोंबिवली वाहतूक कोंडीच्या शापातून मुक्त केव्हा होणार?
Published on
Updated on

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण-डोंबिवलीतील वाहन कोंडीची समस्या सुटता सुटत नसल्याने वाहन चालकांसह प्रवासी हैराण आहेत. दररोज सकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत कल्याण-डंबिवलीतील बहुतांशी रस्ते वाहतूक कोंडीत अडकत असल्याने कामावरून परतणाऱ्या नोकरदारांचे सर्वाधिक हाल होत आहेत. या कोंडीतून सुटण्यासाठी एक ते दीड तास लागत आहे. शहरातील अरूंद रस्ते, दामदुपटीने वाढलेली वाहने आणि वाहनतळांच्या सुविधा नसल्याने रस्तोरस्ती दुतर्फा उभी करून ठेवण्यात आलेल्या दूचाक्या, कार आणि टेम्पोसारखी वाहने वाहतूक कोंडीत सर्वाधिक भर घालत आहेत.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात मागील पाच वर्षांपासून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उड्डाण पूल उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे हा परिसर नेहमीच वाहतूक कोंडीत असतो. कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक, महंमद अली चौक, गुरुदेव हॉटेल चौक, संतोषी माता रोड, सहजानंद चौक, आदी परिसरात वाहनांची सर्वाधिक वर्दळ असते. कल्याण पश्चिमेतील पूर्व भागात जाण्यासाठी बहुतांशी वाहन चालक रामबागेतील गल्ल्यांचा वापर करत असतात. ही वाहने या गल्ल्यांमधून कल्याण-मुरबाड रोडवर येऊन बाईच्या पुतळ्याकडे वळण घेत असताना रेल्वे स्टेशनकडून येणारी आणि स्टेशनकडे जाणारी वाहने वाहतूक कोंडीत अडकतात. वाहतूक नियंत्रण शाखेचे नसल्याने दुचाकीस्वार या कोंडीत आणखी भर घालतात. कल्याण पश्चिमेतील वाहतूक कोंडीत अडकायला नको म्हणून अनेक चालक कल्याण पूर्व भागातून एफ केबिन पुलावरून कल्याण पश्चिमेत येतात. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडत आहे.

रेल्वे स्टेशनजवळील बस स्टॉप बंद करण्यात आल्याने हे स्टॉप गोविंद करसन चौकात सुरू करण्यात आले आहेत. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरील या बसमुळे कोंडी होते. दुर्गाडी पूल वा आधारवाडीकडून येणारी वाहने सहजानंद चौकातून संतोषी माता रोडने रामबागेतून कल्याण-मुरबाड रोडने जाण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक पाहता ही वाहने कल्याण शहरात सर्वाधिक कोंडी करत आहेत.
पत्रि पुलावर सर्वाधिक वाहतूक कोंडी

पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील रस्ते जागोजागी खोदून ठेवण्यात आले आहेत. पत्रीपुलाजवळ नेहमीप्रमाणे कोंडीला सुरूवात झाली आहे. या पुलापासून एकीकडे कृषी उत्पन्न बाजार समिती, तर दुसरीकडे कचोरे गावापर्यंत वाहनांची रीघ लागलेली असते. यातून होणाऱ्या त्रासाविषयी केडीएमसीसह वाहतूक नियंत्रण विभागाला सजगता नसल्याने वाहन चालक, प्रवासी आणि रस्त्याच्या दुतर्फा राहणारे रहिवासी संतप्त आहेत. उन्हाचे चटके, वाहतूक कोंडी, इंधनाचा अपव्यय आणि वाहनांमुळे होणारे प्रदुषण, अशा कचाट्यात सध्या कल्याण-डोंबिवलीकर अडकले आहेत. पावसाळ्यापूर्वीचे सामान घर खरेदीसाठी कल्याणजवळील मुरबाड, शहापूर, आदी भागातील नागरिक मोठ्या संख्येने वाहने घेऊन शहरात येत आहेत. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news