

शहापूर ( ठाणे ) : राजेश जागरे
भातशेतीची लागवड केल्याच्या दिवसांपासून शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने भातशेती संकटात येण्याची भीती निर्माण झाली आहे. यंदा पावसाने या महिन्यात दमदार हजेरी लावली आहे. यंदाही तालुक्यात किमान ३ हजार हेक्टर क्षेत्रात भात, नागली आणि वरई आदी पिकांची लागवड झाली आहे. दरम्यान भाताच्या पिकांमध्ये दाणा तयार होण्याची प्रक्रिया सुरू होत असतानाच अतिपावसाने दाणा भिजण्याची भीतीवजा शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, शहापूर तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहे.
शहापूर तालुक्यात यावर्षी अधिक पाऊस पडत असून अजूनही पावसाचा जोर कायम आहे. या पावसाचा शेतीवर विपरीत परिणाम झाला आहे. ७ मे पासून पावसाला सुरुवात झाली असून तो अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. यामुळे नदी, नाले, ओढे, शेती तुडुंब भरून वाहत आहेत. मागील वर्षी ऑगस्टमध्ये पावसाच्या हुलकावणीमुळे भातशेतीला आवश्यक असलेला पाऊस न मिळाल्याने निम्मी पिके जळून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यावर्षी परिस्थिती उलट असून निम्यापेक्षा अधिक भातपिके ही भाताच्या लोंब्या बाहेर पडूनही पाण्यात आहेत. तर काही दाणा तयार होऊन कडक उन्हाच्या प्रतीक्षेत आहेत. जर या भातपिकाला आवश्यक ऊन मिळाले नाही तर मात्र उरली सुरली पिकेही वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. मागीलवर्षी भातसा धरण क्षेत्रात २०१७मिलीमीटर पाऊस पडला होता यावर्षी हे प्रमाण ३ हजार ९६७ मिलीमीटर इतके असून ते येत्या काही दिवसात वाढणार आहे. शहापूर परिसरात आजपर्यंत ३ हजार ४६० मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली असून मागीलवर्षी ती २ हजार १२ मि.मी होती. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करतांना दिसत आहेत.
शहापूर तालुक्यातील सर्वच भागांत संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे हळवे भातपीक धोक्यात आले आहे. पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास जातो की काय या भीतीने शेतकरी हवालदिल झाला आहे. मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे भातपिकाला आलेला फुलोरा खुडून पडत असल्याने भाताचा दाणाच तयार होणार नाही. परिणामी, भातपिकाचे मोठे नुकसान होणार आहे. पावसाचा मुक्काम असाच कायम वाढत राहिला तर भातपिकाची संपूर्ण नासाडी होऊन शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान होणार आहे.
यंदा पावसाचा मुक्काम वाढल्याने भातपिकांवर रोगांचा प्रादुर्भावाचे प्रमाण ही वाढले आहे. भातपिकांवर पडलेल्या खोडकिड्याने मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर औषध फवारणीचा अधिकचा भार आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शासन स्तरावरून गांभीर्यपूर्वक दखल घेऊन संबंधित औषध तत्काळ मोफत उपलब्ध करून द्यावीत अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. दरम्यान बगल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी युरिया खताची खरेदी केली. मात्र पाऊस विश्रांती घेत नसल्याने भात पिकांवर खत मारणे शक्य झाले नाही. पर्यायाने घरात ठेवलेल्या खताचेच पाणी होण्यास सुरुवात झाली