

वाडा (ठाणे) : वाडा ते भिवंडी या महामार्गाच्या काँक्रीटीकरणाला सुरुवात झाली असून अनेक टप्प्यात एकेरी रस्त्याचे काम देखील पूर्ण झाले आहे. वाडा तालुक्यातील वैतरणा नदीच्या पुलाजवळ नव्याने तयार होत असलेल्या काँक्रिट रस्त्याला भगदाड पडले असून हा निकृष्ट कामाचा नमुना असल्याचा अनेकांनी आरोप केला आहे.
कंत्राटदार कंपनीच्या एका अधिकार्याला विचारणा केली असता रस्त्याच्या जॉइंटवर थोडा भाग खचला असून अवजड वाहतूक रोखणे अशक्य होत असल्याने हा प्रकार झाला आहे, दुरुस्ती केली आहे मात्र वाहतूक सुरूच राहिली तर पुन्हा तिथे रस्ता खराब होण्याची शक्यता आहे असेही त्यांनी सांगितले.
वाडा ते भिवंडी या महामार्गाच्या दुर्दशेविषयी नुकताच तब्बल 12 तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले असून यावेळी कासवगतीने व निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आंदोलनांनी आरोप केला होता. आंदोलनाला काही तास उलटले नाहीत तोच वैतरणा पुलाजवळ काँक्रिटचा काही भाग उखडल्याचे पहायला मिळाले. खरेतर या महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम उत्तम दर्जाचे सुरू असताना उखडलेला भाग नक्कीच चिंताजनक असून कंत्राटदाराने या भागाची दुरुस्ती देखील केली आहे.
महामार्गावर काँक्रीटीकरण सुरू असताना एकेरी वाहतूक मात्र खड्ड्यांमुळे जीवघेणी बनत होती. काँक्रीटीकरण झाल्यावर 28 दिवसांत त्यावरून वाहतूक खुली करता येते मात्र एकेरी मार्गाची दुर्दशा झाल्याने अनेक ठिकाणी वेळेची मर्यादा पाळली जात नाही. यातूनच हा मार्ग उखडल्याचे बोलले जात आहे. 12 तासांच्या आंदोलनाने तातडीने काँक्रिट मार्ग खुले करण्यात आले असून काँक्रिट मार्गावरून अवजड वाहनांना बंदी असतानाही बंदी केवळ फलकांवर असून प्रत्यक्षात वाहनचालकांची मनमानी येथे पहायला मिळत आहे. काँक्रीटीकरणाच्या बाजूचा एकेरी मार्ग तातडीने दुरुस्त करून अवजड वाहनांची रवानगी त्यादिशेने करावी अशी मागणी केली जात आहे.