ठाणे ः कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या गावातून मी आलो तेव्हा गावची लोकसंख्या 1700 होती, तेव्हाही गावच्या शाळेत बोटावर मोजण्याइतके विद्यार्थी होते, पण मराठी शाळा बंद पडली नाही, आता मात्र पटसंख्येची कारणे देऊन जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या शाळा बंद केल्या जात आहे. जिल्हा परिषद किंवा महापालिकांच्या सरकारी शाळेत शिकलेले असंख्य विद्यार्थी शास्त्रज्ञ किंवा अन्य मोठ्या पदांवर आहेत.
या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा बुध्द्यांक खूप चांगला असतो, त्यामुळे सरकारी शाळांमधील एका तुकडीत एक विद्यार्थी असला तरी मराठी शाळा बंद पडू देऊ नका, असे आवाहन 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले. मराठी भाषा जपणे हे आपले धर्मकर्तव्य असल्याचे पाटील यांनी नमूद केले.
सातारा येथे होणाऱ्या 99व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचा शनिवारी ठाणे महानगरपालिकेतर्फे सत्कार करण्यात आला. ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्याहस्ते पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, अभिनेते सागर तळाशीलकर, कवी दुर्गेश सोनार, ज्येष्ठ अभिनेते नारायण जाधव, संवेदना प्रकाशनाचे नितीन हिरवे उपस्थित होते.
यावेळी कवी सतीश सोळांकूरकर यांच्या कवितांचे कवी दुर्गेश सोनार यांनी केलेल्या रसग्रहणावर आधारीत ‘सोळा अंकुरांचे लालित्य’ या संग्रहाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात हा कार्यक्रम झाला.
मराठी भाषा, संस्कृती कधी नव्हे एवढ्या धोक्यात आहे, त्यामुळे आपली मराठी भाषा जपण्यासाठी तिची काळजी घेण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज असल्याचे पाटील म्हणाले. जगातले कुठलेही सरकार भाषेचे जतन करण्यासाठी पुढे येत नाही, त्यामुळे मराठी भाषेसाठी उठाव करण्यासाठी आता लोकांनी नेटाने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन नवी मुंबई महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांनी केले.
100वे साहित्य संमेलन ठाण्यात व्हावे अशी मागणी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ यांनी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे केली. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने राज्यातील 36 जिल्ह्यांत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रा. ढवळ यांनी दिली.
सारा गाव मामाचा, एक नाही कामाचा
मी दिल्ली, मुंबईत कार्यक्रमांना गेलो. तेथे मला कवीवर्य अशोक बागवे यांचे विद्यार्थी भेटले. बागवे यांचे खूप प्रशंसक आहेत, त्यांचे साहित्यही आहे, असे असताना बागवे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले नाहीत, त्यामुळे मराठीत सारा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा या म्हणीप्रमाणे बागवे यांना संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत त्यांच्या प्रशंसकांनी का नेले नाही, असा सवाल 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी उपस्थित केला. तर, साहित्य संमेलनाच्या पुढील अध्यक्षपदासाठी विश्वास पाटील यांनी कवीवर्य अशोक बागवे यांचे नाव सुचित करावे, असे मत ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी व्यक्त केले.