मुंबई : प्रकाश साबळे
मुंबई महापालिकेतील विभाग कार्यालयात गेल्या तीन वर्षांपासून सहायक आयुक्तांप्रमाणे विभाग कार्यकारी अभियंत्यांची कमतरता आहे. परिणामी अनेक वॉर्डात सहाय्यक अभियंत्यांच्या खाद्यांवर प्रभारी आणि अतिरिक्त कार्यभार देवून कार्यकारी अभियंता पदाचे कामकाज केले जात आहे. मात्र आता पालिकेत सेवा ज्येष्ठतेनुसार मॅकेनिकल संवर्गातील 56 सहायक अभियंत्यांची कार्यकारी अभियंतापदावर पदोन्नती होणार आहे. यामुळे पालिकेत 56 विभाग कार्यकारी अभियंत्यांचा नेमणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई महापालिकेतील सिव्हिल संवर्गातील 29 दुय्यम अभियंत्यांचे सहायक अभियंता तर मॅकेनिकल संवर्गातील 56 सहाय्यक अभियंत्यांचे कार्यकारी अभियंता असे एकूण 85 अभियंत्यांचे नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात प्रमोशन होणार आहे. महापालिका मुख्यालयात नुकतीच पदोन्नती कमिटीची बैठक झाली असून या अभियंत्यांच्या पदोन्नतीला मंजुरी मिळाल्याची माहिती नगर अभियंता विभागातील सूत्रांनी दिली.
महापालिकेच्या अनेक विभाग कार्यालयात विभाग कार्यकारी अभियंता, इमारत बांधकामे व कारखाने विभागातील पदनिर्देशक अधिकारी (डी.ओ.) या पदावर सहायक अभियंता यांना अतिरिक्त व प्रभारी कार्यभार दिलेले आहेत. यामुळे वॉर्डात अनेक समस्या आणि बेकायदा बांधकामे वाढलेली आहेत. त्यावर अंकुश ठेवण्यास हे प्रभारी अभियंते अपयशी ठरत आहेत. मात्र आता पुर्णवेळ कार्यकारी अभियंते नियुक्त झाल्यास विभागातील विकास कामांसह बेकायदा बांधकामांवरील कारवाईला बळ मिळेल.
मुंबई महापालिकेत ए ते टी अशी 24 विभाग कार्यालये आहेत. यापैकी 15 ते 20 विभाग कार्यालयात कार्यकारी अभियंता आणि पदनिर्देशक अधिकारी पदावर सहायक अभियंता संवर्गातील अभियंत्यांची वर्णी लावलेली आहे. तर काही वॉर्डात कार्यकारी अभियंता पद हे रिक्त तर काही वॉर्डात त्याची जबाबदारी ही सहाय्यक आयुक्त यांच्याकडे आहे.
यांना अद्यापही ब्रेक
सिव्हिल संवर्गातील सहाय्यक अभियंता पदावरील 160 पदांची न्यायालयीन प्रक्रिया अर्थात केस सुरु असल्याने या संवर्गातील अभियंत्यांच्या कार्यकारी अभियंता पदावरील पदोन्नतीला ब्रेक लागला आहे. यामुळे ज्याची न्यायालयात केस सुरु नाही, अशा अभियंत्यांचे प्रमोशन करण्याचा निर्णय पालिका प्रशासकाने घेतल्याने 85 अभियंत्यांच्या प्रमोशनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
या विभागात होणार नियुक्ती
विभाग कार्यालय (परिरक्षण) विभाग
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग
घनकचरा व्यवस्थापन विभाग
जलकामे, गार्डन, रस्ते विभाग
इमारत व प्रस्ताव विभाग