

डोंबिवली शहर : दिवाळीनंतर थोडी उसंत मिळाली असं गृहिणींना वाटत असतानाच पुन्हा एकदा महागाईने भाज्यांच्या टोपलीला चटका दिला आहे! काही दिवस स्थिर असलेले दर आता झपाट्याने वाढू लागले आहेत. पावसाच्या लपंडावामुळे भाजीपाल्याची आवक घटल्याने डोंबिवलीच्या बाजारपेठेत भावांचा 'खेळ' पुन्हा रंगला आहे.
अवकाळी पावसानंतर काही भागांतून भाजीपाल्याचा पुरवठा कमी झाल्याने बाजारात दररोज भावात चढउतार सुरू आहेत. शनिवारी भाजी खरेदीसाठी गृहिणींची ओघ वाढला होता. मात्र, वाढत्या दरामुळे अनेकांनी "थोडं कमी घ्या" म्हणत खरेदी आवरली. विक्रेत्यांच्या मते, सध्या काही भागांतून माल कमी प्रमाणात येत असल्याने फुलकोबी, गवार आणि सिमला मिरची यांचे दर झपाट्याने वाढले आहेत. त्यामुळे महागाईचा ताण पुन्हा एकदा गृहिणींच्या बजेटवर पडू लागला आहे. तर पालेभाज्यांचे दरही वाढले आहेत. कोथिंबीर, पालक, शेपू आणि चवळी यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत वाढले आहेत.
डोंबिवलीतील मंगेश यादव भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, अवकाळी पावसामुळे मालाचा पुरवठा अनियमित आणि मर्यादित प्रमाणात होत आहे. त्यामुळे दरांमध्ये रोजच चढ-उतार सुरू आहेत. तर दुसरीकडे ग्राहकांचे म्हणणे आहे की, "दिवाळीनंतर दर कमी होतील" अशी अपेक्षा होती. मात्र परिस्थिती उलट झाली. डोंबिवली बाजारपेठेत भाज्यांच्या भावांचा खेळ सुरूच आहे. काही भाज्यांनी थोडासा 'स्वस्ताईचा श्वास' दिला असला, तरी इतरांनी पुन्हा महागाईचा धक्का दिला आहे. त्यामुळे गृहिणींच्या बजेटवरील ताण अजूनही कायम आहे.
मटार स्वस्त, पण फुलकोबी-सिमला मिरचीला 'महागाईचा मुकुट'!
हिरवा वाटाणा २ दिवसापूर्वी तब्बल ३२० रुपये किलोवर गेलेला, सध्या २४० रुपये वर कमी झाला आहे. पण फुलकोबी आणि सिमला मिरचीच्या भावात पुन्हा उसळी आली आहे. फुलकोबी १६० आणि सिमला मिरची १२० किलोने विकली जात असून, पुलाव, मिक्स व्हेज आणि आलू-गोबीसारख्या डिशेस बनवताना गृहिणींना पुन्हा बजेटचा हिशेब करावा लागत आहे.
अवकाळी पावसामुळे मालाचा पुरवठा कमी प्रमाणात आहे. परवाच वाटाण्याचा भाव तब्बल ३२० रुपये किलो होता, पण आज २४० रुपये किलो झाला आहे. मात्र काही भाज्यांची आवक पुन्हा घटली आहे. विशेषतः सिमला मिरची, फुलकोबी आणि गवारचा भाव झपाट्याने वाढला आहे.
संतोष गोलप, भाजी विक्रेते
66 भाजीच्या टोपलीतून रोज काहीतरी कमी करावं लागतं ! एवढे भाव वाढलेत की शनिवारी-रविवारी एकादशीच्या निमित्ताने भाजी घ्यायला आले तर भाव ऐकूनच मागे वळावं लागतं. आधी टोमॅटो महाग, मग वाटाणा, आणि आता फुलकोबी-सिमला मिरची. घर चालवणं म्हणजे आता दरांची गणितं मांडणं झालंय.
स्वाती पाटील, गृहिणी