

महाड ः श्रीकृष्ण बाळ
महाड-पोलादपूर तालुक्यामध्ये असलेल्या धरण क्षेत्राच्या परिसरातील सिंचनाचे एकूण क्षेत्र लक्षात घेता या धरणांच्या अंतर्गत असलेल्ाा पाणीसाठा अभावानेच वापरला जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
महाड येथील कुर्ले, कोथुर्डे व पोलादपूर तालुक्यातील बाजीरा धरणातून या दोन्ही तालुक्यांतील अनेक गावांना गेल्या दोन दशकापेक्षा जास्त काळापासून पाणीपुरवठा केला जात आहे. या दरम्यान जलसंपदा विभाग जलसंधारण विभाग यांच्यामार्फत तालुक्यात असलेल्या वरंध, खिंडवाडी, पारदुलेवाडी, बिरवाडी खैरे या पूर्ण क्षमतेने असलेल्या तर कोल कोथेरी, नागेश्वरी धरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे मात्र पूर्ण क्षमतेने असलेल्या वरील पाच धरणांपैकी वरंध परिसरातील शेतकरी बांधवांच्या व ग्रामस्थांचा या धरणातील पाणीसाठा भुईमूग भातशेती व अन्य पिकांसाठी वापरला जात असल्याचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही ठिकाणी शेतकरी बांधव या धरणातील पाण्याचा वापर सिंचना करता करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या संदर्भात केलेल्या पाहणीदरम्यान मागील 10 ते 15 वर्षात महाड तालुक्यातील भातशेती करणाऱ्या शेतकरी बांधवांची संख्या ही जवळपास 20 ते 25 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सुमारे अडीच ते तीन दशकांपूर्वी बांधण्यात आलेल्या या छोट्या मध्यम आकाराच्या धरणातून धरण निर्मिती पश्चात काढण्यात आलेले कालवे हे बंदिस्त नव्हते त्यामुळे गेल्या अडीच ते तीन दशकांमध्ये आलेल्या महापूर व अन्य अतिवृष्टी अधिकाऱ्यांनी हे कालवे बुजून गेले आहेत.
ही वास्तवता असली तरी सुद्धा शेतकरी बांधवांकडून या धरण क्षेत्र परिसरात सिंचनाचा वापर करण्याकडे मात्र मानसिकता दिसून आली नव्हती मागील कोरोना काळानंतर मुंबई पुणे ठाणे येथून आलेल्या युवकांमधील अनेकांनी गावामध्येच राहून नवीन पद्धतीची फळ लागवड भाजीपाला करण्याकरता केलेली सुरुवात हा या सर्व प्रक्रियेला अपवाद आहे.
गेल्या दोन दशकांमध्ये झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीने धरण क्षेत्रातील पाणीसाठा देखील झालेल्या घडामोडीने 25 टक्केने कमी झाला आहे. या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांकडून स्थानिक प्रशासन व संबंधित विभागाला धरण क्षेत्रातील गाळ काढण्याची करण्यात आलेली मागणी शासनाकडून आजपर्यंत दुर्दैवाने मंजूर झालेली नाही.
महाड, पोलादपूर तालुक्यातून गेल्या दशकामध्ये स्थलांतर झालेल्या नागरिकांची संख्या या ग्रामीण भागात फेरफटका मारला असता आज सहजपणे अनुभवास येते अनेक गावांमधून ज्येष्ठ नागरिकच वास्तव्यास असल्याचे चित्र दिसून आले आहे.
90 च्या अखेरच्या दशकामध्ये महाडमध्ये आलेल्या औद्योगिक वसाहतीने येथील नागरिकांना शेतकरी बांधवांना रोजगाराचा अन्य पर्याय उपलब्ध झाला मात्र पारंपरिक असलेल्या शेतीकडे यापैकी 50 टक्के पेक्षा जास्त शेतकरी बांधवांनी लक्ष काढून घेतल्याने आज महाड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेती कोरडवाहू झाल्याचे दिसून येते.
महाड-पोलादपूरमधील ग्रामीण भागात प्राधान्याने होत असलेले स्थलांतर रोखण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत कृषी विभाग जलसंधारण विभाग व स्थानिक प्रशासनाने संयुक्तरित्या या धरण क्षेत्रातील ग्रामस्थांची मागणी असलेल्या सूचनांचे पूर्तता करून येथील स्थलांतर रोखण्या कमी त्यांना शेतीकडे व शेतीपूरक व्यवसायाकडे वळवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे.
धरण उशाला मात्र फेब्रुवारी नंतर तहान घशाला या अवस्थेतून येथील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी धरण क्षेत्रातील असलेल्या साठाचा सिंचन क्षेत्राकरिता वापर तसेच या ठिकाणी बुजून गेलेले कालवे नव्याने निर्माण करण्याचे आव्हान राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्यासमोर असून या कामी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन आवश्यक आहे.