

नेवाळी: कल्याण-शिळ रस्त्यावर मंगळवारी दुपारच्या सुमारास मेट्रो १२ चे काम करणाऱ्या कामगारांची बांधकाम गॅलरी कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने दुपारच्या सुमारास कामगार गॅलरीत नव्हते आणि वाहन देखील कमी प्रमाणात असल्याने यावेळी धोक्याची घंटा टळली आहे.
या प्रकारानंतर पुन्हा एकदा मेट्रो १२ चे सुरू असलेल्या कामाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अद्याप एमएमआरडीएकडून कोणताही खुलासा या घटनेवर केलेला नाही.
कल्याण-शिळ रस्त्यावरील सोनार पाडा गावच्या बस स्टॉप जवळ मेट्रो १२ चे काम सुरू आहे. हे काम करत असताना कामगार बांधकाम गॅलरीचा वापर करतात. मात्र अचानक मोठ्या प्रमाणात आवाज आल्याने सर्वांच्या नजरा मेट्रोच्या सुरू असलेल्या कामाकडे वळल्या होत्या.
यावेळी कामगारांची बांधकाम गॅलरी खाली येताना नागरिकांना दिसून आली आहे. गॅलरी कोसळण्याची वेळ दुपारची असल्याने वाहनांची वर्दळ परिसरात कमी होती.
दरम्यान सुदैवाने या गॅलरीमध्ये कामगार नसल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. त्यामुळे जलदगतीने सुरू असलेले हे काम कामगारांच्या आणि कल्याण-शिळ रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एमएमआरडीएच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष
कल्याण शिळ रस्त्यावर मेट्रोचे पिलर उभे राहिले आहेत. त्यांची उर्वरित काम जलदगतीने सुरू आहेत. त्यामुळे ही काम करताना वाहनचालकांसह कामगारांच्या सुरक्षेकडे देखील एमएमआरडीए आणि ठेकेदाराने लक्ष देणे गरजेचे झाले आहेत. गेल्या काही वर्षातील दुसरी अपघाताची घटना समोर आली आहे. त्यामुळे आता एमएमआरडीएच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.