Vasai Fort Battle 1739: वसई किल्ला मोहिमेत चिमाजी आप्पांसाठी बलिदान देणारे डोंबिवलीचे आन- मान ठाकूर बंधू कोण होते?

Battle of Vasai Was Fought Between:दोन तरूण डोंबिवलीतल्या ठाकुर्ली गावचे दोघे सख्खे भाऊ आन आणि मान ठाकूर तयार झाले.
aan thakur maan thakur memorial
aan thakur maan thakur memorialPudhari
Published on
Updated on

Who were Aan Thakur Maan Thakur 1739 Vasai Fort Battle

डोंबिवली : बजरंग वाळुंज

डोंबिवलीला मध्यमवर्गीय चाकरमान्यांचा इतिहास आहे. डोंबिवलीकरांच्या शौर्याचा, त्यागाचा आणि हौतात्म्याचा गौरवशाली इतिहास आहे. त्यातील डोंबिवलीकर असलेल्या आन आणि मान ठाकूर बंधूंच्या हौतात्म्याला 3 मे रोजी 276 वर्षे उलटली आहेत.पोर्तुगीजांकडून रयतेवर होणारा अनन्वित छळ रोखण्यासाठी चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली वसई किल्ल्याच्या ठिकर्‍या उडवताना डोंबिवलीचे दोन वाघ शहीद झाले.

क्रांतीदिनाच्या पार्श्वूमीवर या दोन्ही शूर वाघांच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. रयतेवर अन्याय-अत्याचार करणार्‍या पोर्तुगीजांची सत्ता उलथवून टाकण्यात सिंहाचा वाटा घेणार्‍या, देशासाठी आत्मबलिदान देणार्‍या आन आणि मान ठाकूर बंधूंच्या शौर्याचा इतिहास जाणून घेऊया.

स्वराज्याच्या लढाईतील वसईचा संग्राम आणि त्या विजयात ऐतिहासिक सोनेरी पान कोरणारे हुतात्मा आन आणि मान ठाकूर यांच्याकडे पाहिले जाते. ज्यांच्या ताब्यात समुद्र त्यांच्या हातात सत्ता...हे छत्रपती शिवाजी महाराजांसह तत्वविर छत्रपती संभाजी महाराजांनी जाणले होते. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांचे शुर सेनानी थोरले बाजीराव पेशव्यांच्या मदतीने ई. स. 1700 काळात पोर्तुगीजांकडून रयतेवर होणार्‍या अत्याचारांबाबत त्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली वसई किल्ला जिंकण्याची मोहीम हाती घेतली. 90 आधुनिक पोर्तुगीज तोफा या किल्ल्यावर आग ओतण्याकरिता सज्ज झाल्या होत्या. पाण्यात असल्या कारणाने हा किल्ला कुणाला सहजासहजी जिंकता येणारा नव्हता. स्वराज्यासह धर्मावर आलेले गंडांतर रोखण्यासाठी चिमाजी अप्पांनी विडा उचलला.

aan thakur maan thakur memorial
Vengurla Dutch Vakhar : डचांनी वेंगुर्ल्यात वखार का बांधली, वेंगुर्ला हे व्यापाराचे केंद्र कसे बनले?

वसईची मोहीम केवळ जमिनीवरची नव्हती तर पाण्यावरही लढायला लागणार असल्याचे चिमाजी आप्पांना कोकणचा सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी कळवले. वसई किल्ला पाण्यातला आहे. त्यासाठी तराफे, होड्या, गलबते यांचा ताफा कल्याण, अंजूर, ठाणे या भागातून उपलब्ध होणार होता. दारुगोळा, रसदही जमिनीमार्गे आणि गलबते कळवा खाडीमार्गे भाईंदर बंदर येथे पोहोचवण्याचे ठरले.

17 फेब्रुवारी 1739 रोजी मराठा सैन्याने वसई किल्ल्याला वेढा दिला. वसईच्या किल्ल्याला 11 बुरुज आहेत. अनेक बुरुज अथांग समुद्राला आव्हान देणारे होते. पोर्तुगीजांकडे अत्याधुनिक युद्धसामुग्री, त्यात निसर्गाचीही त्यांना साथ होती. मे महिना उजाडला. वेढा देऊन तीन महिने झाले. किल्ल्याचे बुरुज काही ढासळत नव्हते. पोर्तुगीज सैन्य हटत नव्हते. मराठ्यांच्या छावणीवर चिंतेचेढग दाटून आले होते. अशातच पेशव्यांच्या छावणीत आगरी समाजाची पंचमंडळी आली. सोबत दोन तरुण होते.

Vasai Fort
Vasai FortPudhari

पंच म्हणाले, महाराज हे दोन युवक सख्खे भाऊ असून ते उत्तम दर्यावर्दी आहेत. त्यांना सुरुंग लावण्याची कला अवगत आहे. कल्याण परिसरातील डोंबिवली गावचे हे रहिवासी आहेत. आन ठाकूर आणि मान ठाकूर अशी त्यांची नावे आहेत. यांना सुरुंगाचा दारुगोळा द्या...पंचांनी शिफारस केली आणि ती कारणीही लागली. एप्रिल 1739 दरम्यान वसईचा किल्ला घेण्यासाठी चिमाजी आप्पा उल्हासनदी पार करुन सरदार गंगाजी नाईक-अंजुरकर यांच्या अंजुर गावात आले. तेथे त्यांनी गंगाजींच्या वाड्यातील सुवर्ण गणेशाची मनोभावे पुजा केली. अनेक सरदारांबरोबर वसई मोहिमेसंबंधी चर्चा केली. तेव्हा त्यांना असे समजले की वसईचा किल्ला हा तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढला आहे.

एका बाजूला दलदलीच्या भागातून एका अरुंद वाटेने किल्ल्यात प्रवेश करता येतो आणि भरतीच्या वेळी तो भागही पाण्याखाली जातो. घाटमाथ्यावरुन आलेल्या सैन्याला अवघड होते. म्हणून चिमाजी आप्पांनी उल्हास नदीकाठच्या गावांतील अनेक तरुणांना सोबत घेऊन वसईवर चाल केली. मराठ्यांचे आरमारप्रमुख आंग्रेसुद्धा या युद्धात सामील झाले. अनेक दिवस गेले, महिने गेले. पावसाळा जवळ येत होता. पण किल्ला काही मराठ्यांच्या ताब्यात येत नव्हता. पोर्तुगीजांचा सेनापती सिल्व्हेरा दि मेंजेस हा निकराने किल्ला लढवत होता.

समोरील बुरजावर असलेल्या तोफेतून किल्ल्याच्या जवळ येणार्या मराठी सैन्यावर तो आग ओकत होता. मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. किल्ल्यात प्रवेश करायचा तर समोरचा बुरुज पाडणे जरुरीचे होते. पण मराठ्यांच्या तोफा तिथपर्यंत पोहोचत नव्हत्या, मग करायचे काय ? अशावेळी असे ठरवण्यात आले की, कुणीतरी रात्रीच्या अंधारात पाण्याखालुन जाऊन समोरील बुरुजाला सुरुंग लावायचा. पण हे अवघड आणि जिकिरीचे काम करणार कोण ? या कामासाठी पट्टीचा पोहणारा व जास्तीत जास्त वेळ पाण्यात डुबी मारणाराच पाहीजे.

aan thakur maan thakur memorial
Lohagad Fort: शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला लोहगड

दोन तरूण डोंबिवलीतल्या ठाकुर्ली गावचे दोघे सख्खे भाऊ आन आणि मान ठाकूर तयार झाले. एकदा पाण्याखाली गेले की कित्येक वेळ ते पाण्याखालीच राहत असत. चिमाजींनी या दोघा भावांना सुरुंग लावण्याचे प्रशिक्षण दिले. ३ मे १७३९ रोजी दोघेही रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी पोलादी पहारी घेऊन पोहत किल्ल्याच्या तटाजवळ गेले. दोघे भाऊ सुरुंगाच्या नळकांड्या व विस्तवाचे सामान एका चामडी पिशवीत भरुन पाण्याखालून किल्याच्या तळापर्यंत पोहोचले. मुख्य बुरुजाच्या कपारीत सुरुंगाच्या नळकांड्या लावल्या आणि मशालीने त्यांना बत्ती दिली. सकाळच्या प्रहरी स्फोट घडवले. शक्तिशाली मोठा स्फोट झाला आणि प्रचंड असे दोन बुरुज पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. मात्र याच सुरुंग स्फोटात आन आणि मान ठाकूर यांनी मराठा साम्राज्यासह धर्मरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. बुरुजाच्या ढिगाऱ्याखाली दोन आगरी वाघ ठार झाले होते.

आता किल्ल्यात घुसायला मराठ्यांना वाट मोकळी झाली होती. मराठ्यांनी एक निकराचा हल्ला केला. त्यात पोर्तुगीजाचा सेनापती सिल्व्हेरा दि मेंजेस ठार झाला. पोर्तुगीज शरण आले. अशा प्रकारे १२ मे १७३९ रोजी वसईची मोहीम चिमाजी आप्पा यांनी फत्ते केली. अवघ्या १३ दिवसांत १६ मे १७३९ रोजी चिमाजी आप्पांनी वसईच्या किल्ल्यावर भगवा फडकावला.

पुण्याला परतताना चिमाजी आप्पा डोंबिवलीला ठाकूर बंधूंच्या घरी गेले. तेथे त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले व त्यांना पाच गावची पाटीलकी बहाल केली. तेव्हापासून या घराण्याचे आडनाव ठाकूर ऐवजी पाटील झाले. ही गोष्ट इथेच संपली नाही.

पुढे जेव्हा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी या घराण्यातील तरूण वकील नकुल पाटील यांना अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातल्या निवडणूक रिंगणात उतरवून आमदार म्हणून निवडून आणले व आपल्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यांची निवड केली. प्रथमच आगरी समाजाची शासनदरबारी नोंद घेण्यात आली. त्यानंतर याच डोंबिवलीतल्या जगदीश ठाकूर या तरूणाने पुढाकार घेतला. आन ठाकूर-मान ठाकूर स्मृती समिती, इतिहास संकलन समिती आणि डोंबिवली शहर इतिहास मंडळ यांना एकत्र आणून जगदीश ठाकूर याने १७ मे २०२४ रोजी आन ठाकूर-मान ठाकूर यांना अभिवादन करणारा सोहळा आयोजित केला. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.

डोंबिवली, कल्याण, भिवंडी गावच्या भूमिपुत्र आगरी समाजात पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मौखिक परंपरांमध्ये, वीर कथांमध्ये, शाहिरी पोवाडे यातून आन आणि मान ठाकूर यांच्या शौर्यासंबंधी उल्लेख आलेला आहे. हभप शंकरबुवा पाटील यांनी लिहिलेल्या ठाणे जिल्ह्यातील स्वातंत्र्याचा लढा व क्रांतिवीर आंदोलने या पुस्तकातील हे संदर्भ आहेत. 281 वर्षे उलटून आजही ठाकूर बंधूंची शौर्यगाथा ऐकली-वाचली की अंगावर रोमांच उभे राहतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news