

वैजापूर : कुणबी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ८ महिन्यांपासून प्रतीक्षा करूनही प्रमाणपत्र मिळत नसल्याने तालुक्यातील खरज येथील उदय सोनवणे यांच्या कुटुंबातील चार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी शुक्रवारी (दि. २८) दुपारी सोनवणे कुटुंबीयांनी वैजापूर शहरातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या या विद्यार्थ्यांची जात वैधता अद्याप प्रलंबित आहे. निर्धारित मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास प्रवेश रद्द केला जाईल, असे महाविद्यालयाने स्पष्ट केल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
याची माहिती मिळाल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोनवणे कुटुंबाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. मात्र, प्रशासनाकडून अद्याप ठोस तोडगा न निघाल्याने शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास सोनवणे कुटुंबीयांनी वैजापूर शहरातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले.
एकाच कुटुंबातील चारही विद्यार्थ्यांनी जात वैधतेसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करूनही आठ महिन्यांपासून प्रमाणपत्र प्रलंबित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश वाचवून जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली.
दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी सोनवणे कुटुंबीयांची समजूत काढत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.