

उल्हासनगर : दारूच्या नशेत वाद होऊन मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी शकील खलील शेख याने ४६ वर्षीय अनिल रामचंद्र कांबळे यांचा दारूच्या नशेत खून केल्याची माहिती हिललाईन पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शकील शेख हा कॅम्प ५ मधील न्यू नेहरूनगर झोपडपट्टी मध्ये राहतो. त्याच्या घरी मयत अनिल कांबळे हा दारू पिण्यासाठी गेला होता. दारूच्या नशेत असताना दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले. रागाच्या भरात शकील शेख याने घरातील बांबू उचलून अनिल कांबळे यांना जबर मारहाण केली. या मारहाणीत कांबळे यांच्या शरीरात गंभीर रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच हिललाइन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप हे घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी शकील शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हिललाईन पोलिस करीत आहेत.