

शहापूर (ठाणे) : राज्यात अमरावती, जालना, नाशिक सर्वत्रच अवकाळी पावसाचे थैमान सुरु आहे. यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शुक्रवार (दि.4) रोजी दुपारच्या सुमारास शहापूर तालुक्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली असून वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अवकाळी तडाखा बसल्याने शेतकरी वर्ग चिंतेंत आहे.
शहापूरमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून मुंबई- नाशिक महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक बंद झाली आहे. मुंबई- कसारा रेल्वेवर पत्री शेडचा पत्रा येऊन पडल्याने तानशेत स्टेशनजवळ रेल्वे उभी करण्यात आली आहे. परिणामी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मुंबई- नाशिक महामार्गावर विद्युत लाईनच्या वायरी तुटून महामार्गावर पडल्या आहेत. शहापूर तालुक्यातील खर्डी जवळील रातांधळे गावाजवळ या वायरी तुटून महामार्गावर पडल्याने दोन्ही मार्ग बंद झाले आहेत. परिणामी मुंबईहून नाशिक व नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक खोळंबली असल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.