

ठाणे : अनधिकृत बांधकाम प्रकरणी न्यायालयाने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे गोत्यात आलेल्या पालिका अधिकार्यांची अक्षरशः भंबेरी उडाली असून यातील सध्या पालिकेच्या सेवेत कार्यरत असलेल्या अधिकार्यांची आता धावाधाव सुरु झाली आहे. त्यामुळे आपल्या बचावासाठी हे अधिकारी पुन्हा एकदा राजकीय आश्रयाला गेले असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या कचाट्यात सापडलेल्या या अधिकार्यांची ही राजकीय मंडळी पाठराखण करणार का ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणार्या ठाणे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या चौकशी अधिकार्यांनी अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहे. ठाणे महापालिका आयुक्तांना हे प्रश्न विचारण्यात आले असून विचारलेल्या प्रश्नांमुळे पालिकेचे आजी आणि माजी असे दोन्ही अधिकारी अडचणीत आले आहेत.
याशिवाय आता अनधिकृत बांधकाम करणार्या भूमाफियांचे धाबे देखील दणाणले आहेत. तर या प्रश्नांमुळे ठाणे महापालिका प्रशासनाचीही अक्षरशः कोंडी झाली असून यासंदर्भात आता पालिका आयुक्त काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र त्यापूर्वी ज्या अधिकार्यांच्या संदर्भांत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत त्या अधिकार्यांची अक्षरशः धावाधाव सुरु झाली आहे. गुरुवारी अडचणीत आलेले पालिकेचे महत्वाचे अधिकारी हे सर्व प्रकरण घेऊन बड्या राजकीय नेत्यांच्या आश्रयाला गेले असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
मुंब्रा, दिवा आणि शीळ भागातील अनधिकृत बांधकामाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने ठाण्याच्या मुख्य न्यायमूर्ती यांना चौकशी करण्यासाठी जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी जी भन्साली यांची चौकशी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली होती. न्यायमूर्ती भन्साली यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि समाजसेवक यांची साक्ष घेतली होती. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी साक्ष दिली असून न्यायमूर्ती भन्साली यांनी महापालिका आयुक्त राव यांना 19 प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे यामध्ये हे संबंधित अधिकारी आता अडचणीत सापडले आहेत.
अधिकार्यांची उडाली भंबेरी
आपल्या बचावासाठी संबंधीत अधिकारी राजकीय नेत्यांकडे गेले असले तरी,या राजकीय नेत्यांनी मात्र अद्याप त्यांची भूमिका विशद केलेले नाही. त्यामुळे बचावासाठी धावपळ करणार्या या अधिकार्यांची भंबेरी उडाली असून ते किती यशस्वी होतात हे येत्या काही काळातच स्पष्ट होणार आहे.