

ठाणे : सात ते आठ वर्षांपासून पुनर्विकास रखडविणार्या विकासकाचीच एस.आर.ए प्रकल्पासाठी निवड करण्यात आली असल्याने प्रशासनाने लादलेला विकासक आम्हाला नको,आमचा विकास आम्हीच करणार अशी भूमिका नळपाड्यातील रहिवाशांनी घेतली आहे. यासाठी नळपाडा रहिवासी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याचा निर्णय देखील या सर्व रहिवाशांनी घेतला आहे. रहिवाशांच्या या भूमिकेमुळे प्रकल्प राबवण्या संदर्भातील विकासकाच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत.
नळपाडा येते एस.आर.ए प्रकल्प राबवण्यासाठी गेल्या आठवड्यात या झोपड्यांचे बायोमेट्रिक करण्याचा प्रयन्त प्रशासनामार्फत करण्यात आला होता. त्यानंतर दुसर्या दिवशी या बायोमेट्रिक सर्व्हेला विरोध करत मोठ्या संख्येने नागरिकांनी एस.आर.ए कार्यालयावर मोर्चा काढला होता. विकासकाची निवड केल्याची माहिती देखील रहिवाशांना नसून पुनर्विकास राखडवणारा विकासक आम्हाला नको अशी भूमिका घेत या रहिवाशांनी संबंधित विकासाला आपला तीव्र विरोध दर्शवला आहे. तर यासंदर्भात एक महत्वाची बैठकही गुरुवारी रहिवाशांच्या वतीने घेण्यात आली.
यामध्ये विकासाला विरोध दर्शवत आपला विकास आपणच करणार,यासाठी विकासकाची निवड देखील आपणच करणार असल्याची भूमिका रहिवाशांनी घेतली. तर यासाठी नळपाडा रहिवासी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती रहिवाशांनी दिली आहे.
सुभाषनगर, गांधीनगर परिसराचा सात ते आठ वर्षांपासून पुनर्विकास रखडविणार्या बिल्डरचीच विकासासाठी निवड झाल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली. तसेच सर्वेक्षणाला तीन महिन्यांची स्थगिती देण्याची मोर्चेकर्यांकडून मागणी करण्यात आली होती. मात्र, त्याला एसआरएच्या अधिकार्यांनी ठाम नकार दिला होता.या संस्थांचे पदाधिकारी व सदस्य कोण आहेत, याबाबत रहिवाशांमध्ये संभ्रमावस्था आहे.
नळपाडा झोपडपट्टीतील अनेक कुटुंबे नोकरी-व्यवसायानिमित्ताने मूळ ठिकाणाऐवजी अन्य ठिकाणी तात्पुरती स्थलांतरित झाली आहेत. तर झोपडपट्टीतील अनेक कुटुंबांना घराचा पुरावा सादर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. झोपडपट्टीतील काही कुटुंबांनी आपली घरे भाड्याने दिली आहेत. त्यामुळे मूळ घरमालकांपर्यंत माहिती पोचलेली नाही, याकडे रहिवाशांकडून लक्ष वेधण्यात येत आहे.
नळपाड्यालगतच्या गांधीनगर, सुभाषनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील बिल्डरचीच पुनर्विकासासाठी निवड करण्यात आली आहे. याबाबत दोन्ही संस्थांच्या सर्वसाधारण सभा कधी झाल्या, याची माहिती नागरिकांना मिळालेली नाही. तर गांधीनगर व सुभाषनगरमधील विस्थापित कुटुंबांना भाडे वेळेवर मिळत नाही. अशा परिस्थितीत नळपाड्यातील नागरिकांची फरपट होऊ नये, यासाठी आम्ही लढा देणार आहोत, अशी भूमिका नागरिकांकडून मांडण्यात आली.