

Unauthorized construction in 27 villages under Kalyan Dombivali Municipal Corporation area
नेवाळी : पुढारी वृत्तसेवा
ग्रामपंचायतींच्या माध्यमातून बांधकाम परवानग्या घेतल्यानंतर २७ गावांचा समावेश केडीएमसी क्षेत्रात करण्यात आला होता. मात्र आता या गावांची दस्तनोंदणी सुमारे आठ वर्षांपासून शासनाने बंद ठेवली आहे. गावांमधील झालेली बांधकाम अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत दस्तनोंदणी बंद करण्यात आली आहे. या बंद असलेल्या नोंदणीमुळे स्थानिक लहान उद्योजकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून अनेकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. परंतु दस्तनोंदणी सुरू व्हावी यासाठी लोकप्रतिनिधींकडून देखील हालचाली होत नसल्याने उद्योजकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असलेल्या २७ गावांमध्ये बेसुमार अनधिकृत बांधकाम झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या गावांमधील दस्तनोंदणी बंद करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीसह अंबरनाथ शहरात दस्तनोंदणी सुरू होती. मात्र गेल्या काही वर्षात शासनाने व लोकप्रतिनिधींनी दस्तनोंदणी सुरू करण्यासाठी काही हालचालींचा केल्या नसल्याने भूमिपुत्रांमध्ये नाराजीचा सूर आहे.
निवडणुकीच्या कालखंडात राजकीय नेत्यांनी दस्तनोंदणी सुरू करणार असल्याचे आश्वासन हे उद्योजकांना दिले होते. मात्र प्रत्यक्षात दिलेल्या शब्दाला राजकीय नेते जागले नसल्याने उद्योजकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
राज्याच्या तिजोरीवर सध्या लाडकी बहीण योजनेसह अन्य योजनांचा अतिरिक्त ताण आला आहे. अनेक मंजूर असलेली का मे निधी अभावी स्थगित आहेत. परंतु बंद असलेली दस्त नोंदणी शासनाला महसूल मिळवून देणारी असल्याने बांधकाम परवानगीधारकांना शासनाने दस्तनोंदणी करून देण्यास परवानगी देण्याची मागणी उद्योजकांची आहे. या संदर्भात उद्योजकांनी लोकप्रतिनिधींच्या भेटीगाठी देखील घेतल्या होत्या. मात्र निवडणुकीआधी दिलेली आश्वासन लोकप्रतिनिधी नंतर विसरून जात असल्याने आता करायचं तरी काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
केडीएमसी क्षेत्रात असलेल्या २७ गावांमध्ये बांधकाम करण्यासाठी अनेक बँकांनी उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून दिले आहेत. एवढंच नाही तर ग्राहकांना देखील मोठ्या प्रमाणात कर्जाची उपलब्धता करून दिली आहे. दस्तनोंदणी शासनाच्या माध्यमातून झाल्याने बँक कर्ज देत होती. मात्र अनेक उद्योजकांनी बँकांकडून बांधकामासाठी कर्ज घेतल्यानंतर दस्तनोंदणी बंद झाल्याने घेतलेले कर्ज फेडायचे कसे ? असा प्रश्न उद्योजकांसमोर उभा ठाकला आहे.