

Dumper overturns after hitting vehicles on Ring Route
सापाड : पुढारी वृत्तसेवा
रिंगरुट मार्गावर गुरुवारी सकाळी एका मालवाहू अवजड वाहनाने रस्त्याशेजारी उभ्या चारचाकी आणि दुचाकींना धडक देत वाहनाचे मोठे नुकसान केले आहे. या अपघातात अवजड वाहनाच्या चालकाचा गाडीवरील कंट्रोल सुटून समोर उभ्या असणाऱ्या चार चारचाकी वाहनांना धडक देत डंपर पलटी झाला. पलटी झालेल्या डंपरखाली दोन बाईकचा चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलीस स्टेशनचे पोलिसांनी घटनासाठी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. या रिंगरुट मार्गावर दररोज आठ ते दहा अपघात हे किरकोळ होत असल्यामुळे त्याची नोंद कुठेही करण्यात आली नाही. त्यामुळे कल्याण रिंगरूट मार्गाला गांभीयनि घेण्याची गरज आहे. अन्यथा रिंगरूटमुळे येणारा काळ कल्याणकरांसाठी दुर्दैवी असल्याच्या चर्चा रिंगरूट मार्गावर सुरू आलेल्या अपघाताच्या सत्रानंतर सुरू आहेत. कल्याण रिंगरूट मार्गाचे काम सुरू असताना सुरक्षेच्या अभावामुळे कल्याणकारांच्या मुळावर उठले आहे. परिणामी वाहतुकीसाठी सुरू होण्याआधीच रिंगरूट मार्गावर अपघाताचे सत्र सुरू झाले असून रिंगरूट मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कल्याण रिंगरूट मार्गावर होणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांमुळे रिंगरूट मार्ग नेहमीच चर्चेच्या झोतात झळकत आहे. कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्राला लाभलेला विस्तृत खाडीकिनाऱ्यावरून जाणाऱ्या कल्याण रिंगरूटचे काम शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपले आहे. दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि शहरातील वाहतूकव्यवस्था नियंत्रित करणारा रिंगरूट सुरू होण्याआधीच कल्याणकरांचा जीवावर उठला आहे. कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी २३ मार्च २०१२ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या १६२ व्या मुंबई महानगर प्राधिकिकरणाच्या बैठकीत कल्याण डोंबिवली रिंगरुट (बाह्यवळण) रस्त्याच्या भूसंपादनासाठी मान्यता देण्यात आली होती.
त्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राला लाभलेला २४ किलोमीटरचा विस्तृत खाडी किनाऱ्यावरून कल्याण रिंगरूटच्या मार्गाचा मान्यता देण्यात आली होती. कल्याण रिंगरूटच्या मार्गासाठी आठशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र आठ वर्षात या रिंगरूट मार्गासाठी तब्बल बाराशे कोटीचा खर्चाची निविदा मंजूर करण्यात आली आहे. या रिंगरूट मार्गात स्पीड ब्रेकर नसल्यामुळे वाहन चालक धूम स्टाइलने आपली वाहने हाकत आहेत. रिंगरूट सुरू होण्याआधीच रिंगरूट मार्गावर असंख्य अपघात घडले असून या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.