

सापाड : योगेश गोडे
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थापनातील गंभीर प्रकाराने ग्रामस्थांचा संताप उफाळून आला आहे. कल्याणातील उंबर्डे डम्पिंग ग्राउंडवर पालिका हद्दीबाहेरील कुजलेला मांसकचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावर घाला पडत असून श्वसनासह इतर आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या कुजलेल्या मांस कचर्यामुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याचे देखील ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
केडीएमसीच्या घंटागाडीवरून कुजलेले मास सरळ उंबर्डे डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे डम्पिंग शेजारील परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. ग्रामस्थांनी या प्रकाराविरोधात आक्रमक भूमिका घेत दोषींवर तत्काळ कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कुजलेल्या मांसकचर्यामुळे परिसरात असह्य वातावरण निर्माण झाले आहे. याचा थेट परिणाम आमच्या मुला-बाळांच्या आरोग्यावर होत असून, श्वसनाचे आजार वाढत आहेत. ठेकेदार आणि संबंधित ड्रायव्हरवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थ संजय कारभारी यांनी व्यक्त केली. तर, ग्रामस्थ वंडर कारभारी यांनी सांगितले की, या प्रकारामुळे ग्रामस्थांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत.
दोषींवर कारवाई झाली नाही, तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील. पालिका हद्दीबाहेरील कुजलेल्या मांसकचर्याचा डोंगर उभारल्यामुळे संबंधित प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रशासनाकडून या प्रकारात दोषींवर कारवाई होत नसेल, तर ग्रामस्थांच्या आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही.