

किन्हवली : संतोष दवणे
निवडणूक प्रचारादरम्यान फक्त आश्वासने देणारे उमेदवार निवडणुका झाल्यावर जनतेला आणि जनतेच्या समस्यांना सोयीस्करपणे केराची टोपली दाखवतात याची प्रचिती सध्या किन्हवली परिसरातील हजारो नागरिकांना येत आहे. खराब रस्ते, रखडलेल्या पाणीयोजना, प्रलंबित लघुपाटबंधारे प्रकल्प, आरोग्यकेंद्रांची दर्जावाढ, किन्हवली तालुका निर्मितीचा प्रश्न, बकाल पोलीस वसाहत, रोजचीच वाहतूक कोंडी, बेरोजगारी, शेतकर्यांची व आपत्तीग्रस्तांची लटकलेली नुकसानभरपाई अशा एक ना अनेक समस्यांनी किन्हवली परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. त्याचा फटका येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी करू इच्छिणार्या नेत्यांना नक्कीच बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना या राजकीय पक्षांचे अनेक बडे पुढारी किन्हवली परिसरात राहतात. मात्र किन्हवली परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून त्या सोडवण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न या राजकीय पक्षांकडून होताना दिसत नाहीत.
शहापूर तालुक्यातील किन्हवली, सावरोली (सो) या जिल्हा परिषद गटांत पाणी, रस्ते, आरोग्य, वाहतूकीच्या समस्या वर्षानुवर्षे आ वासून उभ्या आहेत. त्यांच्या निराकरणासाठी सामान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार सातत्याने लेखी पाठपुरावा करत असले तरी स्थानिक आजी, माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आहेत यांनाही हे प्रश्न तडीस नेण्यात अपयश आल्याने नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे.
सावरोली(सो) ग्रामपंचायत क्षेत्रातील 12 गावपाड्यांच्या पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढणारा नामपाडा कुतरकुंड लघु पाटबंधारे प्रकल्प 2009 पासून अर्धवट अवस्थेत आहे. मानेखिंड डोया जलसिंचन प्रकल्पाचे सर्वेक्षण होऊनही प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नाही. प्राथ.आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर धूळ खात पडून आहे. अनेकदा निवेदने देवूनही कुठलाही निर्णय होऊ शकलेला नाही.
किन्हवली परिसरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावायचे असतील तर मतदारांनी तात्कालिक लाभाचा विचार न करता दान म्हणून योग्य उमेदवाराला मतदान करायला हवे. प्रशासनाला जागे करण्यासाठी जन आंदोलनही उभारावे लागेल.
सुनिल रमेश धानके, सामाजिक कार्यकर्ते