

उल्हासनगर: उल्हासनगर कॅम्प क्रमांक २ येथील रमाबाई टेकडी बुद्ध विहाराजवळ देवी विसर्जन करून परतणाऱ्या भक्तांवर दगडफेक केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी साहिल उर्फ नोडी जोगदंडे याला अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक २ येथील रमाबाई टेकडी येथे जय अंबिका तरुण मित्र मंडळामार्फत नवरात्रोत्सव आयोजित करण्यात आली होती. दसऱ्याच्या दिवशी देवी विसर्जन करून परतत असताना रविवारी रात्री नशेडी टोळक्याने दगडफेक करीत हल्ला चढवल्याने रात्री गोंधळ घडला. सागर सुरडकर उर्फ पिकाचू, मारी, रिक्षा चालवणारा गोजा, गफलती उर्फ सोनू, नोडी उर्फ साहिल, श्रवण, सिद्धार्थ यांच्यासह दहा जणांच्या टोळक्याने अचानक दगडफेक केली. त्यानंतर धारदार शस्त्रांनी हल्ला करून गणेश पवार याच्या पायावर व वैभव लोंढे याच्या डोक्यावर वार करण्यात आला. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हे दाखल करीत तपास सुरू केला होता. रात्री परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पोपटराव नवले, पोलीस अंमलदार सुजित भोजने, प्रमोद कांबळे, संदीप शेकडे, संदीप सोनवणे, राजू तडवी त्यांच्या पोलीस पथकाने रात्री उशिरा साहिल उर्फ नोडी जोगदंडे याला ताब्यात घेतले आहे.