

Gangster Arrested Ulhasnagar
उल्हासनगर : सराईत गुंडाने दहशत माजवण्यासाठी गरब्याच्या कार्यक्रमात शिवसेना शाखा प्रमुखावर बंदूक रोखत गोळीबार केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीला उल्हासनगर गुन्हे शाखेने अवघ्या काही तासात गजाआड केले आहे.
उल्हासनगर कॅम्प 2 मधील 24 नंबर शाळा परिसरात बंजारा विकास परिषद येथे बालाजी मित्र मंडळाचा गरबा आहे. ह्या गरब्याचे आयोजक शिवसेना शाखाप्रमुख बाळा भगुरे हे आहेत. त्यांना स्थानिक सराईत गुन्हेगार सोहम पवार याने गरब्याच्या ठिकाणी मंगळवारी रात्री पावणे बारा वाजता अडवले. गरब्याला माझ्याकडून परवानगी घेतली का, मी इकडचा भाई आहे असे म्हणत सोहमने अग्निशस्त्र काढून बाळा भगुरे यांच्यावर रोखले. बाळाच्या भावाने मध्यस्थी करीत त्याना वाचवले. मात्र चिडलेल्या सोहमने दहशत माजवण्यासाठी त्याच्या कडच्या गावठी पिस्तूलाने हवेत दोन गोळ्या झाडल्या होत्या. या प्रकरणी बाळा भगुरे यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सोहमच्या शोधात पोलीस पथके रवाना झाली होती. उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार बाबू जाधव यांना माहिती मिळाली होती की मिलिटरी तलाव परिसरात सोहम पवार येणार असल्याची माहिती मिळाली होती. ह्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीरंग गोसावी, पोलिस उप निरीक्षक अशोक पवार, पोलिस अंमलदार मंगेश जाधव, प्रसाद तोंडलीकर, बाबू जाधव, अविनाश पवार यांच्या पथकाने सापळा रचून सोहमला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता गावठी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. त्याला पुढील कारवाईसाठी उल्हासनगर पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.