

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प 5 मधील कैलाश कॉलनी येथे मुस्लिम समाजासाठी दफनभूमीची परवानगी मिळावी, या मागणीसाठी मुस्लिम जमात सेवा फाउंडेशनच्या वतीने उल्हासनगर महापालिका कार्यालयासमोर मागील आठ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. मात्र पालिका प्रशासन निर्णय घेत नसल्यामुळे अखेर आज मुस्लिम समाजाने पालिकेची दोन्ही गेट बंद करून जोरदार घोषणाबाजी केली.
उल्हासनगर शहराच्या विकास आराखड्यात वर्ष 1974 मध्ये भूखंड क्रमांक 244 हा दफनभूमीसाठी आरक्षित करण्यात आला होता. 2019 मध्ये या जागेला अधिकृत दफनभूमी म्हणून मान्यता देखील देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात अद्यापही दफनविधीसाठी प्रशासनाने कोणतीही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे समाजात तीव्र नाराजी आहे. या उदासीनतेच्या निषेधार्थ संस्थेचे अध्यक्ष जलील खान, कार्याध्यक्ष शकील खान, अनिलकुमार सिन्हा यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. सात दिवस उलटल्यानंतरही कोणताही तोडगा न निघाल्याने शुक्रवारी नमाजानंतर समाजातील तरुणांनी थेट महापालिकेचे दोन्ही गेट अडवले.
या घटनेमुळे महापालिकेचे कामकाज पूर्णतः ठप्प झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मध्यवर्ती पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर गेट काही वेळासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी आंदोलनकर्ते आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये मध्यस्थी करत चर्चा घडवून आणली, मात्र ती निष्फळ ठरली. परिणामी, आंदोलनकर्त्यांनी साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.