

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या महापौर अश्विनी निकम यांच्या अध्यक्षतेखाली कामगार संघटनांसोबत पार पडलेल्या बैठकीत उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना मागील वर्षी प्रमाणेच १८ हजार रुपये दिवाळी बोनस देण्याबाबत पालिका प्रशासनाचा सूर आहे. महागाईच्या काळात बोनस मध्ये वाढ न झाल्याने कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देण्यात येते. त्यानुसार लेबर फ्रंटने २५ हजार रुपये, म्युनिसिपल लेबर युनियन २५,००० रुपये, महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कर्मचारी कामगार सेना २५,००० रुपये, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस २५ हजार रुपये, भारतीय कामगार कर्मचारी महासंघ २८ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली होती. यावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी महापौर अश्विनी निकम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला लेबर फ्रंटचे नेते श्याम गायकवाड, आखिल भारतीय सफाई कामगार काँग्रेसचे चरणसिंग टाक, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे दिलीप थोरात, भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे राधाकृष्ण साठे, दीपक दाभणे आदी उपस्थित होते. बैठक पूर्वनियोजित असतानाही आयुक्त मनीषा आव्हाळे या उपस्थित राहिल्या नाहीत. त्यांच्या ऐवजी उपायुक्त दिपाली चौगुले यांनी बैठकीला हजेरी लावली. त्यात कामगार नेत्यांनी एक मत करीत २५ हजार रुपयांची मागणी केली.
महानगरपालिकेची आर्थिक स्थिती आणि महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने यंदाच्या वर्षी मागील वर्षी प्रमाणे १८ हजार रुपये दिवाळी बोनस देण्यास पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे या तयार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. मात्र त्याला कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. तेव्हा कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेण्यासाठी आयुक्त कार्यालय गाठले. मात्र आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना वेळ न दिल्यामुळे चिडलेल्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलन करून आयुक्तांचा निषेध केला.
या आंदोलनात भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे राधाकृष्ण साठे हे आंदोलनात आघाडीवर होते. त्यानंतर ही बाब महापौर अश्विनी निकम यांना समजल्यावर त्यांनी साठे यांना दालनात बोलावून घेत उद्या आयुक्तांशी बैठक घेऊन चांगला बोनस मिळवून देऊ असे आश्वासन दिल्यानंतर साठे यांनी आंदोलन मागे घेतले.