

उल्हासनगर : प्रशासकीय राजवटीत चार वर्ष मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांना आता नगरसेवकांच्या रोष सहन करावा लागत आहे. अनियमित आणि दूषित पाणीपुरवठ्याचा विषय हा दिवसेंदिवस जटील होत असतानाच महापौरांनी विशेष बैठक बोलावत आता प्रभागात जाऊन समस्या जाणून घेत तिथेच थेट उपाययोजना करणार असल्याचे जाहीर केल्यामुळे गाढ झोपेत असलेल्या अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे.
शुक्रवारी झालेल्या महासभेत नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागातील त्रुटींवर जोरदार नाराजी व्यक्त केली होती. अनियमित पाणीपुरवठा, दूषित पाणी येणे यासह विविध समस्यांवर नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. मात्र वेळ अपुरा पडल्याने त्या दिवशी पाणीपुरवठ्याच्या विषयावर सविस्तर चर्चा होऊ शकली नव्हती.
ही बाब लक्षात घेऊन सोमवारी दुपारी महापौर अश्विनी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली महासभा सभागृहात नगरसेवकांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
50 पेक्षा अधिक नगरसेवकांनी मांडल्या पाणीपुरवठ्याच्या समस्या
सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत 50 पेक्षा अधिक नगरसेवकांनी सहभाग घेत आपल्या-आपल्या प्रभागातील पाणीपुरवठ्याच्या समस्या मांडल्या. पाणी येण्याची वेळ, कमी दाब, गढूळ पाणी, पाईपलाईन गळती अशा अनेक अडचणींवर सविस्तर चर्चा झाली. अखेर पालिका आयुक्त आणि महापौर यांनी थेट प्रत्येक प्रभागात जाऊन पाणीपुरवठ्याच्या समस्या प्रत्यक्ष पाहून त्यावर तात्काळ उपाययोजना केल्या जातील, अशी ठोस घोषणा महापौर अश्विनी निकम यांनी केली. या निर्णयामुळे नगरसेवकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले असून, लवकरच नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.