Thane News : जिल्ह्यातील बाजारपेठा विविधरंगी गजरे, वेण्यांनी फुलल्या
डोंबिवली शहर : संस्कृती शेलार
नवरात्र म्हटली की देवीची आराधना, नऊ दिवस नऊ रंग आणि त्याला साजेसा उत्साह. या रंगीबेरंगी सणात कपडे, दागिने यांची जुळवाजुळव तर असतेच; पण यावर्षी केसात माळल्या जाणार्या गजर्यांनी आणि वेण्यांनी महिलांमध्ये वेगळाच क्रेझ निर्माण केला आहे. परंपरेतला गंध आणि आधुनिकतेचा ताजेपणा या दोन्हींचा संगम साधणार्या गजर्यांनी बाजारपेठ गंधाळली आहे.
यंदा हा उत्सव केसांत गजर्यांनीही रंगीत फॅशनचा जलवा दाखवला आहे. घटस्थापनेपासूनच डोंबिवली, कल्याण परिसरातील बाजारपेठा गजरे आणि देवीच्या वेण्यांनी उजळल्या आहेत. गुलाब, मोगरा, जुई, कुंदा, बकुळ, अबोली यांसारखी पारंपरिक फुले अजूनही अग्रस्थानी आहेत; मात्र ऑर्किड, कार्नेशन, क्रायसँथेमम, लिली यांसारख्या फॅन्सी फुलांचे गजरे आणि वेण्यांनाही मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे.
काही तरुणी कपड्यांच्या रंगाशी जुळणार्या झुंबर वेण्या, मोत्यांनी सजवलेली वेणी, स्टोनवर्क गजरे घेऊन पारंपरिक लूकला आधुनिक स्पर्श देत आहेत.नवरात्रौत्सवात बाजारात काही खास गजरे आणि वेणी महिलांना खूप आकर्षित करत आहेत. गुलाबी-लाल गुलाब, शेवंती, जिप्सी फ्लॉवर, इंग्लिश पाला आणि ऑर्किड अशा फुलांचे गजरे आणि वेणी विक्रीस उपलब्ध असून, शेवंतीसोबत जिप्सी फ्लॉवर, इंग्लिश पाला आणि ऑर्किड यांचा संगम साधलेली वेणी 250 रुपयांमध्ये, तर हिरव्या बटन शेवंती आणि जिप्सी फ्लॉवरपासून तयार केलेली वेणी 150 रुपयांमध्ये मिळते.
नीलांबरी नावाचा खास गजरा 120 रुपयांमध्ये महिलांच्या पसंतीस उतरला आहे. फुलांच्या मागणीमुळे किंमतींमध्येही वाढ झाली आहे. मोगर्याची वेणी पूर्वी 15 रुपयांना मिळत होती, आता ती 30 रुपयांपर्यंत गेली आहे. तर गुलाबाची वेणी 150 रुपयांपासून 250 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ऑर्किडची वेणी 200 रुपयांमध्ये असूनही महिलांचा ओढा तिकडेच आहे, आणि बाजारात गजर्यांचे हे रंगीत व सुगंधी दृश्य नवरात्र उत्साहाला दुप्पट रंग देत आहे.
दर वाढीची चाहूल
पितृपक्ष आणि अवकाळी पावसामुळे काही दिवसांपूर्वी फुलांची मागणी घटली होती. मात्र नवरात्र सुरू होताच बाजारपेठ पुन्हा एकदा फुलांनी उजळली असून दसर्यापर्यंत दर आणखी वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
यंदा नवरात्रात पारंपरिक गजरे आणि फॅन्सी गजरे व वेणी यांची मागणी वाढली आहे. काही दिवस अवकाळी पावसामुळे आणि पितृपक्षामुळे मागणी कमी होती, पण नवरात्र सुरू होताच बाजार पुन्हा उजळला.
वीर बोझरिया कुलदीप, फुलविक्रेता.
साध्या वेणीची किंमत ही आता वाढली आहे. तरी बाजारात विविध प्रकार पाहायला मिळतात. फॅन्सी गजरे मला यंदा खूप आवडले. बाजारात सर्व प्रकारच्या गजर्यांचा उत्साह पाहून खरेदी करताना आनंद दुप्पट होतो.
स्वाती जाधव, ग्राहक.

