

Attack on woman and family Ulhasnagar
उल्हासनगर : मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग मनात धरून एका महिलेसह तिच्या कुटुंबीयांवर बेकायदेशीर जमाव जमवून हल्ला करीत केस कापले, गळ्यात चपलांचा हार घालत भर रस्त्यात धिंड काढल्याची घटना उल्हासनगर कॅम्प ३ परिसरात घडली आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीमती कांता प्रेम राजपुत (वय 50) या आपली बहिण गीता राजपूत व मुलगी अंजली यांच्यासह पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात होत्या. त्यावेळी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प 3 येथील हडकमाता चौक परिसरातील गल्लीत आरोपी वनी त्यांना अडवून मारहाण केली.
यातील आरोपी नितीन थोरात याने फिर्यादीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच अन्य आरोपींनी तोंडावर व पाठीवर लाथाबुक्यांनी मारहाण केली. आरोपी ज्युली वाघरी, विणु वाघरी, नितीन थोरात, रोहित वाघरी, सोनु उर्फ बाळु वाघरी, महेश वाघरी यांनी फिर्यादीचे केस कापल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीची बहिण गीता राजपुत व मुलगी अंजली यांनाही मारहाण करून जखमी करण्यात आले. तसेच पोलिसांकडे तक्रार दिल्यास तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी देत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी ज्युली वाघरी, विणु वाघरी, पप्पी वाघरी, नितीन थोरात, रोहित वाघरी, सोनु उर्फ बाळु वाघरी, महेश वाघरी व इतरांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. मध्यवर्ती पोलिसांनी ज्युली वाघरी आणि विणु वाघरी यांना अटक केली आहे.