

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संदीप जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सार्वजनिक रस्त्यांचे बेकायदेशीररित्या खोदकाम करून मोठे नुकसान केल्याप्रकरणी एका ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे.
ही घटना १२ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी नितीश सावंत नामक ठेकेदाराला विद्युत कामासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (महावितरण) कंत्राट दिले होते. त्यांनी परवानगीमध्ये दिलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन करून किटीकेअर हॉस्पिटल ते टाउन हॉल या १६५ मीटर लांबीच्या रस्त्याचे खोदकाम केले. यामुळे सुमारे ४७,५२,००० रुपयांचे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले.उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने अभियंता संदीप जाधव यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी भादंवि कलम ३२६(ब) नुसार नितीश सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत किर्वे करत आहेत.