

Ulhasnagar Crime
उल्हासनगर : चांदीबाई महाविद्यालयाजवळ असलेल्या राम नाष्टा या हॉटेलमध्ये कांदा द्यायला उशीर केला म्हणून एका ग्राहकाने वेटरला मारहाण करून चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी मॉन्टी बहादूर करोतिया आणि बाबजी करोतीया या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. तक्रारदार सुरजीत उर्फ अमरजीत मोतीराम यादव हे देसले यांच्या मालकीच्या राम नाष्टा हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मॉन्टी करोतिया आणि त्याचा साथीदार हॉटेलमध्ये भजी प्लेट खाण्यासाठी आले होते. यादव यांना त्यांना कांदा देण्यास उशीर झाल्याने करोतिया संतापला. त्याने यादव यांच्या छातीला पकडून त्यांच्या कानशिलात मारली.
यावेळी बाजूलाच मोरे चहा हे दुकान चालवणारे पुंडलिक मोरे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. या आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. यानंतर, मॉन्टी करोतिया हा हॉटेलमधून बाहेर गेला आणि मोटार सायकलच्या डिक्कीतून चाकूसारखे धारदार शस्त्र घेऊन परत आला. त्याने हवेत चाकू फिरवत पुंडलिक मोरे यांना मारण्याचा प्रयत्न केला. त्याने आजूबाजूच्या लोकांना आणि यादव यांच्यासोबत असलेल्या लोकांना धमकावले, "कोई बीच मे नही आयेगा, आया तो काट डालुगां." या घटनेमुळे घाबरून अनेक दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली.
या घटनेनंतर आरोपींनी पुंडलिक मोरे यांना पुन्हा धमकावले व निघून गेले. यादव यांनी याबाबत मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी कलम ११५(२), ३५१(२), ३५२ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१), १३५ सह फौजदारी कायदा कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर वाघमारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.