

उल्हासनगर : माया लॉजच्या दुरुस्तीच्या कामाला गेलेल्या मजुराच्या डोक्यात काँक्रीट स्लॅबचा तुकडा कोसळल्याने मजुराचा मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगर मध्ये घडली आहे.
उल्हासनगर कॅम्प २ मधील रमाबाई टेकडी परिसरात राहणारे रावसाहेब ननावरे हे बिगारी काम करणारे मजूर शनिवारी फर्निचर बाजारातील माया लॉज येथे नूतनीकरणाच्या कामासाठी गेले होते. दुपारी सुमारे चार वाजताच्या सुमारास, माया लॉज आणि शेजारच्या इमारतीच्या मधल्या गल्लीत सफाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी निखळलेला काँक्रीट स्लॅबचा तुकडा ननावरे यांच्या डोक्यावर अचानक कोसळला. या दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले असून, तात्काळ त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले. उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास सुरू केला आहे.
कामाच्या ठिकाणी योग्य ती सुरक्षा नसल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित ठेकेदार आणि इमारत व्यवस्थापनाकडून याबाबत कोणती जबाबदारी घेतली जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.